UP Hathras Stampede : नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये (Hathras) सत्संग दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 116 जणांनी जीव गमावला आहे. ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी भोले बाबाच्या सत्संगसाठी मोठी गर्दी झाली होती. पण हे भोले बाबा नेमके आहेत तरी कोण? एवढी मोठी दुर्घटना घडली तरी कशी? 


विश्व हरी भोले बाबा यांना त्यांचे अनुयायी भोले बाबा म्हणून ओळखतात. भोले बाबा आणि वाद हे फार जुनं समीकरण आहे. भोले बाबांबाबत सांगताना स्थानिकांनी सांगितलं की, कासगंज जिल्ह्यातील पटियाली येथील बहादूर नगर येथील रहिवासी असलेले विश्व हरी भोले बाबा यांनी साधारणतः 17 वर्षांपूर्वी पोलीस खात्यातील नोकरी सोडून सत्संग सुरू केलं. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त राजस्थान आणि मध्य प्रदेशात भोले बाबांचे अनुयायी मोठ्या संख्येनं आहेत.


तसं पाहायला गेलं तर, त्यांचे अनुयायी मीडियापासून अंतर ठेवूनच असतात. भोले बाबांच्या एका भक्तानं सांगितलं की, त्यांच्या आयुष्यात कोणीच गुरू नाही. व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांची अचानक देवाशी भेट झाली आणि तेव्हापासून त्यांचा अध्यात्माकडे कल वाढला. भगवंताच्या प्रेरणेनं हे शरीर त्याच भगवंताचा अंश आहे, हे त्यांना कळलं. त्यांचं खरं नाव सूरज पाल असून ते कासगंजचा रहिवासी आहेत.


भोले बाबांच्या अनुयायानं पुढे बोलताना सांगितलं की, ते दर मंगळवारी सत्संगला जातात. नुकताच मैनपुरी येथे सत्संग झाला. त्यानंतर हाथरसमध्ये सुरू करण्यात आला. कोरोनाच्या काळातही भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम वादात सापडला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या सत्संगाला फक्त 50 लोकांचीच परवानगी मागितली होती, पण नंतर 50 हजारांहून अधिक लोक त्यांच्या सत्संगाला आले. प्रचंड गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणा कोलमडली होती. 


सत्संगासाठी आलेल्या एका कुटुंबातील लोकांनी सांगितलं की, हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव पोलीस स्टेशन अंतर्गत फुलराई मुगलगढी येथील एका शेतात साकार हरी बाबांचा एक दिवसीय सत्संग सुरू होता. तिथे लहान मुलांसह महिला आणि पुरुष बाबांचं प्रवचन ऐकत होते. सत्संग संपला, बाबांचे अनुयायी रस्त्याकडे जाऊ लागले.


सुमारे 50 हजार अनुयायांना ते जिथे असतील तिथे सेवेदारांनी थांबवलं असल्याचं सांगण्यात येत आहे. सेवकांनी साकार हरी बाबांचा ताफा तिथून बाहेर काढला. तेवढा वेळ अनुयायी उन्हात उभे होते. बाबांचा ताफा निघून गेल्यावर सेवकांनी अनुयायांना जाण्यास सांगताच अनुयायी पळत सुटले आणि त्यावेळी चेंगराचेंगरी होऊन मोठा अपघात झाला.


सत्संगामधील चेंगराचेंगरीत 116 जणांनी जीव गमावला


लहान मुलं आणि वृद्धांचाही चेंगरून काही क्षणात मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील हाथरस येथील आहे. इथं भोलेबाबाचा सत्संग सुरू होता. या सत्संगाला 50 हजाराहून जास्त भाविक आले होते. सत्संग संपल्यानंतर घरी जाताना झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 116 भाविकांचा मृत्यू झाला आहे आणि मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जातेय. सत्संग संपल्या संपल्या बाहेर पडण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली. बाहेर जाण्याच्या वाटेत दुचाकी पार्क केल्या होत्या, त्यामुळे अडथळे वाढले. या सगळ्या गोंधळात लोक एकमेकांवर पडत गेले आणि अनेक भाविकांचा गुदमरून मृत्यू झाला.


हाथरसमध्ये नेमकं काय घडलं?


सिकंदराराऊच्या फुलरई गावात भोलेबाबांचा सत्संग सुरु होता. सत्संगसाठी प्रचंड गर्दी जमली होती. या सत्संगामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक होती. सत्संग संपल्यावर बाहेर पडण्यासाठी रेटारेटी झाली. पुढे जाण्याच्या नादात चेंगराचेंगरी झाली. लोक एकमेकांवर पडू लागले, भाविक चिरडले गेल्यानं मृतदेहांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं.