अलाहाबाद : उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर आता हटवण्यात येणार आहेत. प्रशासनाची परवानगी न घेतलेल्या लाऊडस्पीकरवरच या निर्णयाचा परिणाम होईल. अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशानुसार अशा मंदिर, मशीद आणि गुरुद्वारांचा शोध घेतला जात आहे.


तुम्हा-आम्हाला सामना करावा लागतो त्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. धार्मिक स्थळांवर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवले जातात. मात्र उत्तर प्रदेशात हा प्रकार आता बंद होणार आहे. धार्मिक स्थळांवर परवानगीशिवाय लाऊडस्पीकर लावता येणार नाही, असा निर्णय अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाने दिला आहे.

हा नियम तोडणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. उत्तर प्रदेशच्या मुख्य गृहसचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे दिले आहेत. त्यामुळे यूपीत आता मंदिर, मशीद आणि गुरुद्वारा या सर्व ठिकाणी परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वाजवता येणार नाही. असं केल्यास लाऊडस्पीकर जप्त केला जाईल, शिवाय कायदेशीर कारवाईचा सामनाही करावा लागेल.

नियम मोडणाऱ्या स्थळांची ओळख पटवण्याची मुदत 10 जानेवारीपर्यंत देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरमुळे अनेकदा वाद आणि दंगलीही झाल्या आहेत. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करतानाही वाद होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर सपा नेते आझम खान यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ''भाजपने नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार करणं गरजेचंय. सध्या जिथे लाऊडस्पीकर लावण्यात आलेले आहेत, तिथे परवानगी देण्यात यावी आणि यापुढे परवानगी अनिवार्य करावी'', अशी मागणी आझम खान यांनी केली आहे.