नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील SCAM म्हणजे समाजवादी पक्ष, काँग्रेस, अखिलेश आणि मायावती आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केला. उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मेरठमध्ये सभा झाली. यावेळी मोदींनी समाजवादी पक्षासह काँग्रेसवरही जोरदार टीका केली.


'काँग्रेसवाले उत्तर प्रदेश सरकारला बदनाम करत होते, त्यांच्या कारभारावर टीका करत होते. मात्र आता सत्तेसाठी गळ्यात गळे घालत असल्याचंही मोदी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीवर जोरदार हल्ला चढवला.

मोदी म्हणाले की, ''जोपर्यंत उत्तरप्रदेशातून SCAM संपुष्टात येत नाही, तोपर्यंत उत्तर प्रदेशाचा विकास होणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये भाजपची या SCAM विरोधात लढाई सुरु आहे. या SCAM मधील S म्हणजे समाजवादी पक्ष, C म्हणजे काँग्रेस, A म्हणजे अखिलेश यादव आणि M म्हणजे मायावती आहेत,'' असं त्यांनी यावेळी सांगितलं.

याशिवाय मोदींना या प्रचारसभेत बोलताना, अखिलेश सरकारवर अनेक मोठे आरोप लावले. ते म्हणाले, ''केंद्र सरकारने उत्तर प्रदेशात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी चार हजार कोटी रुपये दिले. पण त्यातील 250 कोटी रुपये ही सरकार खर्च करु शकली नाही. यानंतर पुन्हा सात हजार कोटी रुपये दिले. पण त्यातील 280 कोटी रुपयेही सरकारने जनतेवर खर्च केले नाहीत.''

मोदींनी मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यातील वादावरही चांगलेच तोंडसुख घेतलं. ते म्हणाले की, ''सध्या अखिलेश सरकार कौटुंबिक वादाशी सामना करत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार उत्तर प्रदेशातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्व काही देण्यासाठी तयार आहे. पण इथे एका कुटुंबात अस्तित्वाचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश मधल्या जनतेने सरकार बदलले, तर भविष्य नक्की बदलेल,'' असा विश्वास व्यक्त केला.