अलाहाबाद : उत्तर प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधुम आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरु असतानाही अनेक उमेदवार अर्ज भरण्यासाठीही हटके स्टाईल अवलंबताना दिसत आहे. अलहाबादमध्ये राजेश्वर कुमार शुक्ल हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क श्रीरामाचं वेशात आले होते. राजेश्वर कुमार शुक्ल हे अलाहाबादमधील करछना मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आहेत.


राजेश्वर हे श्रीरामाचं वेशांतर करुन हातात धनुष्यबाण घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना पोलिसांनी रोखलं, मात्र राजेश्वर यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. धक्कादायक म्हणजे राजेश्वर यांनी हातातील धनुष्यबाण थेट सरकारी कर्मचाऱ्यांवरच रोखून धरलं आणि रस्त्यातून बाजूला होण्याची धमकी दिली.



या सर्व गोंधळादरम्यान अर्ज भरण्याची मुदत संपून गेली आणि भगवान श्रीरामाच्या वेशात आलेल्या राजेश्वर कुमार शुक्ल यांना अर्जही भरता आलं नाही. त्यानंतर राजेश्वर यांनी पुन्हा गोंधळ सुरु केला.

राजेश्वर कुमार शुक्ल हे मूळचे भाजपवासीय आहेत. मात्र, करछना मतदारसंघातून त्यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेच्या तिकिटावर लढण्यास पुढे आले.

अर्ज भरण्यासाठी गेलेल्या राजेश्वर यांना पाहण्यासाठीही मोठी गर्दी जमली होती. विरोधक म्हणजे रावण आहेत आणि त्यांचा पराभवातून खात्मा करु, अशी आशा राजेश्वर यांना आहे.