लखनौ : गुन्हेगारांना जेलची हवा खावी लागल्याचं आपण अनेकदा पाहतो. पण उत्तर प्रदेशमध्ये झाडांची पानं खाल्ली म्हणून चक्क आठ गाढवांना तब्बल चार दिवस जेलची हवा खावी लागली आहे. उत्तर प्रदेशातल्या जालौन जिल्ह्यातील उरई इथे ही अजब घटना घडली आहे.
या गाढवांनी जेलबाहेरच्या ज्या झाडांची पानं खाल्ली, ती झाडं अत्यंत महाग होती. 50 ते 60 हजार रुपये खर्च करुन ही झाडं लावण्यात आली होती. त्यामुळे गाढवांना इथे सोडू नको, असं पोलिसांनी मालकाला वारंवार सांगितलं. परंतु तरीही गाढवांनी इथे येऊन पानं खाल्ली. त्यामुळे धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी त्यांना अटक केली, असं पोलिसांनी सांगितलं.
आज (28 नोव्हेंबर) सकाळी बच्चा जेलमधून चार दिवसांपासून कैद असलेल्या आठ गाढवांची सुटका करण्यात आली.
मात्र गाढवांची सुटका इतकीही सहजसोपी नव्हती. गाढवांच्या मालकाने सुरुवातीला कारागृह अधीक्षकांना विनंती केली. परंतु तरीही काही उपयोग झाला नाही. त्यानंतर स्थानिक भाजप नेते शक्ती गहोई यांच्या सांगण्यावरुन गाढवांची सुटका झाली.
काही दिवसांपूर्वी यूपीच्या निवडणुकीत गाढवांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. अमिताभ बच्चन यांनी पांढऱ्या गाढवांबरोबर जाहिरात केली होती. त्यानंतर राजकिय कोपरखळ्यांना सुरुवात झाली होती. त्यानंतर पुन्हा यूपी पोलिसांच्या गाढवपणामुळे ही जेलची हवा खाणारी ही गाढवं पुन्हा चर्चेत आली आहेत.