श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने नवा वाद ओढावून घेतला आहे. यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान मोदींनाच आव्हान दिलं आहे. ‘आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा, आणि मग पाक व्याप्त काश्मीरवर चर्चा करा,’ असं आव्हान दिलं आहे.


काँग्रेस नेते आणि माजी खासदार जी.एल.डोगरा यांच्या 30 व्या पुण्यातिथी निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना फारुख अब्दुल्लांनी हे आव्हान दिलं.

फारुख अब्दुल्ला म्हणाले की, “ते (केंद्र सरकार आणि भाजप) पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याच्या गोष्टी करतात. पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, आधी त्यांनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवावा. तसं करण्याची त्यांच्यात हिंमत नाही आणि पीओकेबाबतच्या बाता मारत आहेत.”

काही दिवसांपूर्वीही फारुख अब्दुल्लांनी पाकव्याप्त काश्मीर हा भाग पाकिस्तानचाच असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरुनही स्पष्टीकरण देताना, आपलं ते वक्तव्य शंभर टक्के खरं असल्याचा दावा केला.

फारुख अब्दुल्ला म्हणाले की, “जर तुम्हाला खरं ऐकायची सवय नसेल, तर तुम्ही आभासी विश्वात जगत आहात. खरं म्हणजे, तो (पीओके) आपला भाग नाहीच. या (जम्मू काश्मीर) भूमीवर देखील ते आपला हक्क सांगू शकत नाहीत. हे वास्तवच आहे.”

'आपल्या वादग्रस्त वक्तव्यातून ते भारतीय जनभावना दुखावत आहेत का?' असा प्रश्न विचारला असता, फारुख अब्दुल्ला म्हणाले की, “भारतीय जनभावना काय आहेत? काय तुम्हाला म्हणायचंय की, मी भारतीय नाही?  तुम्ही कोणाच्या भावनेबद्दल बोलता आहात. त्या दुष्ट माणसांविषयी. ज्यांना आमच्या भावनांची त्रासाची कदर नाही. जे सीमेवर राहणाऱ्या लोकांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करत आहेत. जेव्हा गोळीबार सुरु होतो, तेव्हा इथल्या जनतेला किती त्रास सहन करावा लागतो, हे त्यांना कसं कळणार?”

काही दिवसांपूर्वीच लष्करातील एका जवानाची सुट्टीवर असताना हत्या झाली, त्यावर विचारले असता, फारुख अब्दुल्ला म्हणाले की, “हा प्रश्न केंद्र सरकारलाच विचारला पाहिजे. कारण तेच दावा करत आहेत की, नोटाबंदीमुळे काश्मीरमध्ये शांतता पुन्हा प्रस्थापित झाली.”

राजोरीमधील घटनेचाही त्यांनी निषेध केला. राजोरीमध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रगीत सुरु असताना दोन विद्यार्थी उभे राहिले नाहीत. यावर बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, “देशाचा सन्मान महत्त्वाचा आहे आणि राष्ट्रगीत सर्वाधिक सन्मानिय आहे. या प्रकरणी दोषींनी माफी मागण्यापर्यंत हातावर हात ठेऊन बसण्यापेक्षा त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि यावर प्रतिज्ञापत्र सादर करुन, अशा घटना पुन्हा होणार नाही, याची हमी दिली पाहिजे.” असं सांगितलं.