अमेठी : उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये आज पहाटे एका घरात तब्बल 11 जणांचे मृतदेह सापडले. कुटुंब प्रमुखाचा मृतदेह लटकलेल्य अवस्थेत सापडला. मृतांमध्ये सहा लहान मुलांचाही समावेश आहे. अमेठी हा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा लोकसभा मतदारसंघ आहे.
कुटुंबप्रमुखाने सगळ्यांची हत्या केल्यानंतर स्वत: फास लावून घेतला, अशी शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. परंतु या घटनेमागील नेमकं कारण अद्यार समोर आलेलं नाही.
केवळ पत्नीच जिवंत
अमेठीच्या महोना गावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. कुटुंबातील सगळ्यांची तीक्ष्ण हत्याराने मारल्याचं सांगितलं जात आहे. कुटुंबप्रमुख जमालुद्दीन (वय 45 वर्ष) यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. महत्त्वाचं म्हणजे केवळ जमालुद्दीनची पत्नी जिवंत आहे. बेशुद्ध अवस्थेत तिला सीएचसी जगदीशपूरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिला शुद्ध आल्यावर या संपूर्ण प्रकारामागे नेमकं कारण काय याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपमहानिरीक्षक घटनास्थळी
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस उपमहानिरीक्षक यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
गावकऱ्यांचा संशय काय?
जमालुद्दीनने कुटुंबातील सगळ्यांना अंमली पदार्थ खायला घालून त्यांची हत्या केली. यानंतर स्वत: गळफास घेतला, अशी शक्यता गावकरी व्यक्त करत आहेत.