मुंबई : आपल्या वकिलांशी बोलताना एनआयए अधिकाऱ्यांची तिथं उपस्थिती नको, अशी नवी मागणी सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टाकडे केली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी अटक करण्यात आलेले आणि गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात ही नव्यानं याचिका दाखल केली आहे.


उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी सोडण्यात आली. त्या गाडीचा मालक मनसूख हिरण यांच्या अनाचक मृत्यूनंतर हे प्रकरण खूप गाजलं. त्यानंतर अखेर गुन्हे गुप्तचर शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली. मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयाने वाझे यांचे तीन अर्ज फेटाळून लावले होते. मात्र, त्यांना वकिलांना भेटू देण्याची मागणी अंशत: मान्य करण्यात आली होती. ज्यात चौकशीदरम्यान त्यांच्या वकिलांना तिथं हजर राहण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर वाझे यांनी आता कोर्टात नव्यानं अर्ज दाखल केला असून आपल्या वकिलांशी बोलताना तिथं एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको, अशी मागणी या याचिकेतून केली आहे. त्याची दखल घेत विशेष एनआयए न्यायालयानं एनआयएला यावर शुक्रवारपर्यंत आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत.


Antilia Explosives Scare | आरोपींनी पळ काढलेली इनोव्हा गाडी Sachin Vaze चालवत असल्याचा NIAला संशय


विशेष एनआयए न्यायालयानं सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावल्यानंतर त्याविरोधात सचिन यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा करताना आपल्याला वकिलांशीही भेटू दिले जात नसल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला होता. तेव्हा, एनआयए कार्यालयात सीसीटीव्ही नाही, सरकारी अधिकाऱ्याला अशाप्रकारे अटक करता येत नाही आणि एनआयएकडून अटकेची प्रक्रिया बकायदेशी आहे, असे तीन अर्ज वाझे यांच्यावतीने दाखल करण्यात आले होते. मात्र, एनआयए कोर्टाने वाझे यांचे तीन अर्ज फेटाळून लावले होते.