जिनेव्हा: संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेने (UNSC) दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकीऊर रेहमान लखवीला प्रती महिना खर्चासाठी दिड लाख रुपये देण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ मोहम्मद सुलतान बशीरुद्दीन यांनाही प्रती महिना पैसे देण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्राने मान्य केली आहे. या दोघांना अशा प्रकारचा खर्च द्यावा अशी विनंती पाकिस्तानने केली होती.


सुरक्षा परिषदेच्या 1267 समितीने हा निर्यण घेतला आहे. लखवी हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन प्रमुख आहे. पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ मोहम्मद सुलतान बशीरुद्दीन यांनी पाकिस्तानच्या अॅटोमिक एनर्जी कमिशनसाठी काम केलंय. बशीरुद्दीन यांनी अफगानिस्तानमध्ये जाऊन लादेनची भेट घेतली होती. पाकिस्तान सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलं आहे.


संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या 1267 समितीने घेतलेल्या या निर्णयानुसार जेवणासाठी 50 हजार, औषधं 45 हजार, सार्वजनिक गोष्टींचा वापर 20 हजार, वकिलांची फी 20 हजार आणि वाहतूक खर्च 15 हजार असे एकूण दिड लाखांचा खर्च देण्याचा निर्णय घेतलाय.


संयुक्त राष्ट्राने या दोघांनाही आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकलंय. त्यांना अशा प्रकारचा खर्च द्यावा अशी पाकिस्तानने विनंती केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा खर्च सुरक्षा परिषदेच्या 1267 समितीच्या नियमानुसार आहे असं पाकिस्तानचं मत आहे.


मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर लखवीचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत करण्यात आला होता. जागतिक दबावाखाली आलेल्या पाकिस्ताननं त्याला अटकही केली होती. त्यावेळी फक्त दाखवण्यापुरतं त्याला पाकिस्तानी जेमलध्ये ठेवण्यात आलं होतं असं अनेकांचं मत आहे. कारण रावळपिंडीमधील अदियाला जेलमध्ये असतानाही तो एका मुलाचा बाप झाला होता.


काय आहे हा खर्च?
सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार मूलभूत खर्चाला मंजुरी दिली जाते. त्यात जेवण, औषधं, उपचार, टॅस्क, विमा या सारख्या गोष्टींचा समावेश होतो. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या 1267 समितीत स्थावर संपत्ती, प्रवास आणि शस्त्रास्त्रांचा वापर या तीन गोष्टींवर बंधन आहेत.