Unnao Road Accident : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बुधवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास आराम बस आणि टँकरच्या धडकेत बसमधील 18 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 19 जखमी झाले. मृतांमध्ये 14 पुरुष, 2 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. ही बस बिहारमधील सिवान येथून दिल्लीला जात होती. लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावरील बांगरमाऊ कोतवालीजवळ हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या चालकाच्या बाजूचा भाग पूर्णपणे वेगळा झाला. प्रवासी बाहेर फेकले गेले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अपघाताचे व्हिडिओ समोर आले आहेत. रस्त्यावर मृतदेह विखुरलेले दिसत आहेत. मृतदेह पाहून एक पोलीस बेशुद्ध पडला. या अपघातात बिहारमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा अंत झाला आहे. 


पोलिसांनी सांगितले की, दुधाच्या टँकरला ओव्हरटेक करताना बसचे नियंत्रण सुटले आणि टँकरला धडकून बस उलटली. जिल्हाधिकारी गौरांग राठी यांनी सांगितले की, बसमध्ये 57 प्रवासी होते. सुमारे 20 प्रवासी सुखरूप आहेत. 18 मृतांपैकी 16 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. 19 जखमींना उन्नाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 5 गंभीर जखमींना लखनौ ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. 


कागदावर नोंदवलेल्या बसचा पत्ता खोटा


पोलिसांच्या प्राथमिक तपासात कागदपत्रांमध्ये नोंदवलेल्या बसचा पत्ता बनावट असल्याचे समोर आले आहे. दिल्लीचे रहिवासी असलेले चंदन जैस्वाल हे पहाडगंज येथून बस चालवत होते. तपासादरम्यान बसचे परमिट आणि विमाही आढळून आला नाही. बांगरमाऊ सीओ अरविंद चौरसिया यांनी सांगितले की, 'नमस्ते बिहार' नावाची बस बिहारच्या शिवहर जिल्ह्यातून धावते.  या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आरटीओला याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.


रस्त्यावर मृतदेह विखुरले


बस अपघातात जखमी झालेला प्रवासी शिवम म्हणाला की, अपघात झाला त्यावेळी बसमध्ये सर्वजण झोपले होते. बसचा वेग बऱ्यापैकी होता. आम्ही ड्रायव्हरला अनेकदा बस हळू चालवायला सांगितली होती, पण त्याने ऐकलं नाही. तेवढ्यात अचानक खूप मोठा आवाज आला. मी थक्क झालो. बसच्या काचा फुटल्याचे दिसले. लोक बाहेर रस्त्यावर फेकले गेले होते. आम्ही मागच्या बाजूला बसलो होतो त्यामुळे आमचा जीव वाचला. बस रस्त्यावर उलटली. अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर केवळ मृतदेहच दिसत होते.


भूकंप झाल्यासारखे वाटले


बसमधील प्रवासी मोहम्मद उर्स म्हणाला की, मी शिवहार, बिहारचा रहिवासी आहे. अपघात झाला त्यावेळी मी झोपलो होतो तेव्हा मोठा आवाज झाला. भूकंप झाल्यासारखे वाटले. मी बसच्या दुसऱ्या बाजूला बसलो होतो. मृत्यूपासून थोडक्यात बचावलो. माझ्या हाताला दुखापत झाली आहे. अन्य जखमी प्रदीपने सांगितले की, आम्ही झोपलो होतो. काही समजू शकले नाही. मी डोळे उघडले तेव्हा सगळे रस्त्यावर पडले होते. टक्कर अतिशय भीषण होती. आम्ही दुसऱ्या बाजूला बसलो होतो त्यामुळे आमचा बचाव झाला.


इतर महत्वाच्या बातम्या