रायबरेली: भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर आरोपी असणाऱ्या उन्नाव येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील पीडित तरूणी अपघातात गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात पीडित तरूणीच्या आई आणि काकूंसह अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवती तिची आई, नातेवाईक आणि वकिलांसह जात कारने जात होती. यावेळी रायबरेलीमध्ये ट्रक आणि कारची जोरदार धडक होऊन अपघात झाला. यामध्ये पीडित मुलीची मावशी आणि काकूंसह अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पीडित युवती आणि वकील महेंद्र सिंह गंभीर जखमी झाले आहेत. उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा यापूर्वीच संशयित मृत्यू झाला आहे.


या अपघातात ज्या ट्रकने कारला धडक दिली आहे त्या ट्रकच्या नंबर प्लेटशी छेडछाड करण्यात आली आहे. पोलिसांनी ट्रक जप्त करून ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात भाजपचे आमदार कुलदीप सेंगर आरोपी आहेत. ते सध्या तुरुंगात आहेत. या बलात्कार प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे.

या अपघातानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शंका व्यक्त केली असून त्यांनी ही हत्येचा कट असू शकतो, याची सीबीआय चौकशी व्हावी, असेही त्यांनी म्हटले आहे. उत्तरप्रदेशमध्ये जंगल राज सुरु असून आरोप निर्धास्त आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान पीडित तरूणीच्या बहिणीने देखील या अपघातमागे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या माणसांचा हात असल्याचा आरोप केला आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी जून महिन्यात सेंगरची महिला सहकारी शशि सिंह पीडितेला नोकरी देण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे घेऊन गेली होती. यावेळी कुलदीप सेंगर आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी न्याय मागण्यासाठी पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे गेले. पण भेट मिळू न शकल्याने तिच्यासह तिच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी तिच्यासह कुटुंबियांना ताब्यात घेतलं होतं.

यावेळी पोलिसांच्या मारहाणीत पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी सेंगर विरोधात गुन्हा दाखल केला, पण त्याला अटक केली नव्हती. पण विरोधक, जनतेचा रोष, मीडियाचा दबाव यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. एसआयटीच्या अहवालानंतर योगी सरकारने आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच या घटनेचा संपूर्ण तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.

या प्रकरणात सीबीआयने आरोपी आमदाराला अटक केली नसल्याने अलाहाबाद हायकोर्टानेही फटकारले होते. यानंतर आरोपी सेंगरला लखनौच्या इंदिरा नगर भागातील राहत्या घरातून नाट्यमय पद्धतीने अटक करण्यात आली. यानंतर कुलदीप सेंगरवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या त्याची रवानगी सीबीआयच्या लखनौतील मुख्यालयात करण्यात आली आहे. तर सेंगरची सहकारी महिला शशि सिंह हिला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित बातम्या

VIDEO | भाजप खासदार साक्षी महाराज बलात्कारी आरोपीच्या भेटीला, तब्बल दोन तास चर्चा 


ब्लॉग : बलात्काऱ्यांना फाशीच हवी ; पण...


बलात्काराच्या घटनेवेळी मी कानपुरात होतो, कुलदीप सिंह सेंगरचा दावा


उन्नाव गँगरेप प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला अटक


उन्नाव प्रकरणातील गुन्हेगारांना सोडणार नाही : योगी आदित्यनाथ


उत्तर प्रदेश : उन्नाव बलात्कार प्रकरण : भाजप आमदारावरील आरोपांची चौकशी सीबीआय करणार