नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणाशी संबधित सर्व पाच खटले सुप्रीम कोर्टाने स्वतःकडे घेतले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, पाचही खटले दिल्लीतल्या कनिष्ठ कोर्टाकडे सोपवले आहेत. एकच न्यायाधीश या सर्व खटल्यांवर सुनावणी करतील. सुनावणी सुरु झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत हे पाचही खटले सोडवले जातील. त्याचबरोबर कोर्टाने पीडितेच्या रायबरेली येथे झालेल्या अपघातासंबधीचा तपास 2 आठवड्यांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत.


उन्नाव बलात्कार प्रकरणाशी संबधित 5 खटले
1. पहिला खटला : पीडितेवर झालेला सामुहिक बलात्कार (भाजप आमदार कुलदीप सेंगर याच गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात आहे. )
2. दुसरा खटला : पीडितेच्या पित्यावर अवैध शास्त्रास्त्र बाळगल्याचा आरोप आहे. सीबीआयने आतापर्यंत केलेल्या तपासानुसार असे निश्पन्न झाले आहे की, हा आरोप खोटा आहे. या खटल्याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या पित्याला अटक केली होती. रिमांडमध्ये असताना पोलिसांनी पीडितेच्या पित्याला अमानुष मारहाण केली. त्या मारहाणीत पीडितेच्या पित्याचा मृत्यू झाला.
3. तिसरा खटला : पोलीस रिमांडमध्ये असताना पीडितेच्या पित्याला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत तिच्या पित्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पीडितेच्या आईने आमदार सेंगर, त्याचे साथीदार आणि संबधित पोलिसांवर हा तिसरा खटला दाखल केला आहे.
4. चौथा खटला : पीडित तरुणीवर 2017 मध्ये आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी पुन्हा एकदा सामुहिक बलात्कार केला. पीडित तरुणीने पुन्हा एकदा आरोपींविरोधात सामुहिक बलात्काराची तक्रार केली.
5. पाचवा खटला : 28 जुलै रोजी रायबरेली येथे पीडित तरुणी तिच्या नातेवाईकांसह कारने प्रवास करत होती. तेव्हा त्यांच्या कारचा अपघात झाला. या आपघातात पीडित तरुणीची आई आणि काकूचा मृत्यू झाला. पीडित तरुणी आणि तिचे वकील या अपघातात गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर लखनौ येथील रुग्णालयात उपचार आहेत.

Unnao Rape case | पीडितेचा अपघात नाही तर घातपात : आयबीचा रिपोर्ट | ABP Majha



पीडित तरुणीने 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात तिने म्हटले होते की, आमदार कुलदीप सेंगर आणि त्याच्या परिवारापासून माझ्या जीवाला धोका आहे. तिने पाठवलेले पत्र कोर्टापर्यंत पोहोचले परंतु न्यायमूर्तींच्या कार्यालयात पोहोचले नाही. कोर्टाने ही बाब गंभीरतेने घेतली असून या बलात्काराशी संबधित सर्व खटले स्वतःकडे घेतले आहेत. तसेच तीन दिवसांपूर्वी झालेल्या पीडितेच्या अपघाताबाबत तपास करण्यासाठी सीबीआयने अधिक वेळ मागितला होता. परंतु कोर्टाने अधिक वेळ देण्यास नकार दिला आहे. तसेच दोन आठवड्यांच्या आत सर्व तपास पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरवर आरोप | ABP Majha



दरम्यान, कोर्टाने पीडित तरुणी, तिचे वकील आणि संपूर्ण कुटुंबाला पूर्ण सुरक्षा देण्याचे केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) आदेश दिले आहेत. तसेच उत्तर प्रदेश सरकारला पीडित तरुणीला 25 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, पीडितेने मुख्य न्यामूर्तींना पाठवलेले पत्र वेळेत का पोहोचले नाही? याबाबत तपास करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

Unnao Rape Case | आरोपी आमदार सेंगरची भाजपमधून हकालपट्टी तर सुप्रीम कोर्टाचा अधिकाऱ्यांवर संताप