लखनौ : विरोधी पक्ष आणि मीडिया तसेच सोशल मीडियातून  दबाव आल्यानंतर अखेर  भाजपने उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगरची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सेंगर उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. आमदार कुलदीप सेंगरवर 2017 पासून बलात्काराचा आरोप आहे. मात्र तेंव्हापासून तो भाजपमध्ये टिकून होता. गेल्या आठवड्यात उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत पीडितेची काकू, मावशी आणि कारच्या चालकाचा मृत्यू झाला होता. तर पीडितेची आणि वकिलाची स्थिती गंभीर आहे. त्या दोघांवर उपचार सुरु आहेत. या कार दुर्घटनेमागे देखील आमदार सेंगरचाच हात असल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे.


या घटनेनंतर कुलदीप  सेंगरच्या भाजपमध्ये असण्यावरून प्रश्नचिन्ह उभे केले जाऊ लागले होते. तसेच यावरून भाजपवर टीका होऊ लागल्याने भाजप श्रेष्ठींनी सेंगरला पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी उन्नाव प्रकरणातील पीडितेबाबत विचारपूस केली असून तिच्यावर चांगल्या उपचारासाठी दिल्लीला आणले जाऊ शकते का असेही विचारले आहे. सोबतच पीडितेच्या अपघात प्रकरणाची चौकशी सात दिवसात करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. सोबतच या प्रकरणाशी संबंधित सर्व केसेस दिल्लीबाहेर ट्रान्सफर करण्याचे देखील आदेश दिले आहेत.  उत्तर प्रदेशातील उन्नावच्या बलात्कार पीडित तरुणीने तिला येत असलेल्या धमक्यांबद्दल आपल्या नावे लिहिलेले पत्र तत्काळ पीठासमोर का मांडले गेले नाही, अशी संतप्त विचारणा सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केली.

दरम्यान, उन्नाव बलात्कार पीडितेच्या मोटारीस रविवारी रायबरेली येथे ट्रकने दिलेल्या धडकेत साक्षीदारासह तिच्या दोन नातेवाईक महिला ठार तर तसेच  ती व तिचे वकील गंभीर जखमी झाल्याच्या प्रकरणी आता सीबीआयने चौकशी हाती घेतली असून नव्याने दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक माहिती अहवालात भाजप आमदार कुलदीप सिंह सेनगर व इतर दहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवती तिची नातेवाईक आणि वकिलांसह जात कारने जात असताना रायबरेलीमध्ये ट्रक आणि कारची जोरदार धडक होऊन अपघात झाला होता. यामध्ये पीडित मुलीची मावशी आणि काकूंसह कारचालकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पीडित युवती आणि वकील महेंद्र सिंह गंभीर जखमी झाले आहेत. उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा यापूर्वीच संशयित मृत्यू झाला आहे.

या अपघातात ज्या ट्रकने कारला धडक दिली आहे त्या ट्रकच्या नंबर प्लेटशी छेडछाड करण्यात आली आहे. पोलिसांनी ट्रक जप्त करून ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात भाजपचे आमदार कुलदीप सेंगर आरोपी आहेत. ते सध्या तुरुंगात आहेत. या बलात्कार प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी जून महिन्यात सेंगरची महिला सहकारी शशि सिंह पीडितेला नोकरी देण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे घेऊन गेली होती. यावेळी कुलदीप सेंगर आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी न्याय मागण्यासाठी पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे गेले. पण भेट मिळू न शकल्याने तिच्यासह तिच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी तिच्यासह कुटुंबियांना ताब्यात घेतलं होतं.

यावेळी पोलिसांच्या मारहाणीत पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी सेंगर विरोधात गुन्हा दाखल केला, पण त्याला अटक केली नव्हती. पण विरोधक, जनतेचा रोष, मीडियाचा दबाव यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. एसआयटीच्या अहवालानंतर योगी सरकारने आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच या घटनेचा संपूर्ण तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.

या प्रकरणात सीबीआयने आरोपी आमदाराला अटक केली नसल्याने अलाहाबाद हायकोर्टानेही फटकारले होते. यानंतर आरोपी सेंगरला लखनौच्या इंदिरा नगर भागातील राहत्या घरातून नाट्यमय पद्धतीने अटक करण्यात आली. यानंतर कुलदीप सेंगरवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या त्याची रवानगी सीबीआयच्या लखनौतील मुख्यालयात करण्यात आली आहे. तर सेंगरची सहकारी महिला शशि सिंह हिला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित बातम्या

VIDEO | भाजप खासदार साक्षी महाराज बलात्कारी आरोपीच्या भेटीला, तब्बल दोन तास चर्चा 


ब्लॉग : बलात्काऱ्यांना फाशीच हवी ; पण...


बलात्काराच्या घटनेवेळी मी कानपुरात होतो, कुलदीप सिंह सेंगरचा दावा


उन्नाव गँगरेप प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला अटक


उन्नाव प्रकरणातील गुन्हेगारांना सोडणार नाही : योगी आदित्यनाथ


उत्तर प्रदेश : उन्नाव बलात्कार प्रकरण : भाजप आमदारावरील आरोपांची चौकशी सीबीआय करणार