बाराबंकी (उत्तर प्रदेश) : उन्नाव बलात्कार पीडितेच्या अपघातावरुन वाद सुरु असताना बाराबंकीमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी बालिका जागरुकता कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात छेडछाडीच्या तक्रारीसाठी पोलिसांनी एक हेल्पलाईन क्रमांक जारी केला. मात्र यादरम्यान अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या प्रश्नामुळे पोलिसांची बोलती बंद झाली. बाराबंकीच्या आनंद भवन शाळेत शिकणाऱ्या मुनीबा किदवई या विद्यार्थिनीने असा प्रश्न विचारला की त्याचं उत्तर पोलिसांना देता आलं नाही. "उन्नावच्या एका तरुणीने तक्रार केली म्हणून तिच्या संपूर्ण कुटुंबाला ट्रकने चिरडलं. अशा परिस्थितीत जर छेडछाड करणारा व्यक्ती शक्तिशाली असेल तर तक्रार कशी करायची," असा प्रश्न मुनीबाने विचारला.

मुनीबा किदवई म्हणाली की, "सर, जसं तुम्ही म्हणाला की न घाबरता आपला आवाज उठवला हवा, विरोध करायला हवा. तर सर माझा प्रश्न असा होता की काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्याने एका मुलीवर बलात्कार केला आणि तिच्या वडिलाचा अपघाती मृत्यू झाला. तिच्या वडिलांचा मृत्यू हा अपघात नव्हता, हे सगळ्यांनाच माहित आहे. यानंतर बलात्कार पीडितेच्या कारला धडक दिली. प्रत्येकाला माहित आहे हा अपघात नाही. ट्रकची नंबर प्लेट लपवण्यात आली. समोरचा जर सामान्य व्यक्ती असेल तर विरोध करता येऊ शकतो, पण जर तो नेता किंवा शक्तिशाली व्यक्ती असेल कर काय करावं? जसं निर्भया प्रकरणात पाहिल. आम्ही विरोध करु, पण न्याय मिळेल याची काय गॅरंटी? मी सुरक्षित राहिन याची गॅरंटी काय? माझ्यासोबत काही होणार नाही, याची खात्री काय?"


यावर निश्चितच बालिकांची सुरक्षा वाढेल आणि त्या जागरुक होतील. आवाज उठवतील, असं उत्तर पोलिस अधिकाऱ्याने दिलं.

उन्नाव बालात्कार पीडितेच्या अपघात प्रकरणी सीबीआयने गुन्ह्याची नोंद केली आहे. दहा मुख्य आरोपी आणि 20 अज्ञातांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर प्रमुख आरोपी आहे. आरोपींवर हत्या, हत्येचा प्रयत्न, कट रचणं या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आरोपपत्रात योगी सरकारमधील मंत्री रणवेंद्र प्रताप सिंह उर्फ धुन्नी सिंह यांचा जावई अरुण सिंहचंही नाव आहे. अरुण सिंह हा नवाबगंजचा ब्लॉक प्रमुख हैं.

सीबीआयच्या 12 सदस्यीय टीमने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सीबीआयने जिल्हाधिकारी आणि एसएसपी यांचीही चौकशी केली. याशिवाय अपघात जिथे घडला, त्या आजूबाजूच्या परिसरातील प्रत्यक्षदर्शी असलेल्या चहा आणि पान टपरी मालकांचीही चौकशी करण्यात आली.