नवी दिल्ली : कोरोना संकटदरम्यानच देशव्यापी अनलॉकच्या चौथ्या टप्प्याची मुदत 30 सप्टेंबरला संपणार आहे. आता 1 ऑक्टोबरला अनलॉक-5 ची सुरुवात होणार आहे. केंद्र सरकार अनलॉक-5 अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सूट संदर्भात आज गाईडलाईन्स जारी करण्याची शक्यता आहे. 1 ऑक्टोबरपासून देशात काय सुरु होणार आणि काय बंद राहणार याबाबत अटकळ बांधली जात आहे.
चित्रपटगृह सुरु करण्यासाठी परवानमी मिळण्याची शक्यता
25 मार्चपासून देशभरातील चित्रपटगृह बंद आहे. 1 ऑक्टोबरपासून केंद्र सरकार संपूर्ण देशातील चित्रपटगृह सतर्कतने सुरु करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात सर्व चित्रपटगृह, नृत्य-गायन आणि मॅजिक शो 1 ऑक्टोबरपासून सुरु करण्याची परवानगी आधीच दिली आहे. परंतु यामध्ये 50 पेक्षा जास्त लोक सामील होऊ शकत नाहीत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं आणि कोविड-19 च्या इतर अटींसह ही परवानगी देण्यात आली आहे.
पर्यटन क्षेत्राला दिलासा मिळण्याची शक्यता
लॉकडाऊनमध्ये पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्याच आठवड्यात ताज महलसह काही पर्यटन स्थळं सुरु करण्यात आली होती. अनलॉक-5 अंतर्गत गृह मंत्रालय इतर पर्यटन स्थळही पर्यटकांसाठी खुली करण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे. मात्र उत्तराखंड सरकारने पर्यटक, प्रवाशांसाठी क्वॉरन्टाईनशिवाय राज्यात येण्यास परवानगी दिली आहे.
ऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता; राज्य सरकार नियमावली जाहीर करणार
राज्यात रेस्टॉरंट सुरु होण्याची शक्यता
राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रेस्टॉरंट सुरु होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (28 सप्टेंबर) राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. त्यावेळी रेस्टॉरंट सुरु करण्याची कार्यपद्धती आधी ठरवली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं ठरलं आहे. नेमके रेस्टॉरंट्स कसे सुरु करण्यात येतील? किती टक्के ग्राहकांना रेस्टॉरंट्समध्ये जाण्याची परवानगी असेल? यासाठी नियमावलीही तयार करण्यात येणार आहे.
प्राथमिक शाळा बंद राहण्याची शक्यता
अनलॉक-4 मध्ये गृह मंत्रालयाने देशभरातील कंटेन्मेंट झोन वगळून इतरत्र ठिकाणी नववीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्वेच्छेने शाळेत जाण्यास सूट दिली होती. 21 सप्टेंबरपासून काही राज्यात शाळा पुन्हा सुरु झाल्या. आता इतर राज्यांमध्येही पुढच्या महिन्यात शाळा सुरु करण्याची परवानगी मिळू शकते. मात्र प्राथमिक शाळा मात्र आणखी काही आठवड्यांपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे.
अनलॉक-4 च्या गाईडलाईन्सअंतर्गत चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एन्टरटेन्मेंट पार्कवर बंदी कायम ठेवली होती. सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी 21 सप्टेंबरपासून जास्तीत जास्त 100 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. मार्चपासून बंद असलेले 'बार' 1 सप्टेंबरपासून पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. व्यक्ती आणि वस्तूंच्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यावर कोणतीही बंदी नाही. अशाप्रकारच्या ये-जा करण्यासाठी कोणतीही वेगळ्या परवानगीची किंवा ई-पासची आवश्यकता नाही.