नवी दिल्ली : महागाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला घेरण्यासाठी केलेल्या ट्वीटमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचं गणित चुकलं. यानंतर सोशल मीडियावर भाजपने राहुल गांधींची चूक दाखवून त्यांची खिल्ली उडवली. पण आता राहुल गांधींनी भाजप आणि मोदींवर उपहासात्मक भाष्य केलं आहे.

"भाजपचे माझ्या सर्व मित्रांनो, मी नरेंद्रभाईसारखा नाही, तर एक माणूस आहे. आम्ही चुका करतो पण त्यामुळे आयुष्य आणखी रंजक होतं. चुकीकडे लक्ष वेधल्याबद्दल आभार. कृपया यापुढेही असं करत राहा, यामुळे चूक सुधारण्यासाठी मला मदतच होईल. तुम्हा सगळ्यांना प्रेम," असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

https://twitter.com/OfficeOfRG/status/938291794441396224

राहुल गांधीं मंगळवारी पंतप्रधान मोदींना सातवा प्रश्न विचारला होता. मोदी सरकारच्या काळात गरजेच्या वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं ट्वीट राहुलं यांनी केलं होतं. मात्र, त्यात दिलेली महागाईची टक्केवारी मात्र चुकली होती.

राहुल गांधी यांची चूक भाजपने तातडीने पकडली आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी प्रश्न विचारण्याआधी होमवर्क करा, असा सल्ला राहुल यांना दिला होता. त्यानंतर राहुल गांधींनी साडेतीन तासांनंतर आणखी एक ट्वीट करुन चूक सुधारण्याचा प्रयत्न केला.

संबंधित बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधींचं गणित चुकलं