नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या पत्नीला ब्लॅकमेल करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीच्या तुघलकाबाद पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 
प्रदीप चौहान नावाच्या व्यक्तीने संबंधित मंत्र्याच्या पत्नीकडे दोन कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी प्रदीपने मंत्र्याच्या पत्नीला दिली. त्याचप्रमाणे काही ऑडिओ आणि व्हिडिओ क्लीप्स सोशल मीडियावर जाहीर करण्याची भीतीही दाखवली.

 
या व्हिडिओ क्लीप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास मंत्रीमहोदयांच्या कुटुंबीयांची मान शरमेनं खाली जाईल, असा दावाही आरोपीने केला होता. आरोपी प्रदीप हा तक्रारदार महिलेच्या भाच्याचा परिचित आहे.

 
प्रकरण हायप्रोफाईल असल्यामुळे पोलिसांनी याबाबत मौन बाळगलं आहे. मात्र आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.