Kaushal Kishore On Alcoholics: आपल्या मुली आणि बहिणींचे लग्न मद्यपींसोबत (Alcoholics)  करू नये, मद्यपी अधिकाऱ्यापेक्षा निर्व्यसनी रिक्षावाला किंवा मजूर चांगला, असं वक्तव्य केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर (Kaushal Kishore) यांनी केलं आहे.  कौशल किशोर उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) लंबुआ विधानसभा मतदारसंघात व्यसनमुक्तीवरील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी म्हटलं की, दारु पिणाऱ्यांचे आयुष्य खूपच कमी असते, माझा मुलगा दारुच्या आहारी गेला होता. मी खासदार असून त्याला वाचवू शकलो नाही, सामान्य माणसांसाठी हे अजूनच अवघड असतं, असंही ते म्हणाले.  


'मी खासदार आणि पत्नी आमदार असतानाही मुलाला वाचवू शकलो नाही'


राज्यमंत्री कौशल किशोर म्हणाले की, मी खासदार आणि माझी पत्नी आमदार असताना आमच्या मुलाचे प्राण वाचवू शकलो नाही. तर सर्वसामान्य जनता काय करू शकणार आहे. कौशल किशोर यांनी आपल्या कुटुंबावर ओढवलेल्या दुःख व्यक्त करत सांगितलं की, माझा मुलगा आकाश किशोर त्याच्या मित्रांसोबत नेहमी दारु प्यायचा. त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले होते. सहा महिन्यांनंतर त्याचं व्यसन सुटेल असं गृहीत धरून त्याचे लग्न केले होते, मात्र, लग्नानंतर त्याने पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली आणि अखेरीस त्याचा मृत्यू झाला. दोन वर्षे 19 ऑक्टोबर रोजी आकाशचे निधन झाले तेव्हा त्याचा मुलगा अवघ्या दोन वर्षांचा होता, असं कौशल किशोर यांनी सांगितलं. 


कौशल किशोर म्हणाले की, मुलाच्या मृत्यूनंतर आमची सून विधवा झाली. आमच्यावर अशी वेळ आली. त्यामुळं आपल्या मुली आणि बहिणींना यापासून वाचवा अशी विनंती त्यांनी जनतेला केली.






दरवर्षी सुमारे 20 लाख लोकांचा अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे मृत्यू


केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी सांगितलं की, स्वातंत्र्य चळवळीत 90 वर्षांच्या कालावधीत इंग्रजांशी लढताना 6.32 लाख लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. आणि आता दरवर्षी सुमारे 20 लाख लोक अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे मरतात. तंबाखू, सिगारेट आणि बिडीच्या व्यसनामुळे सुमारे 80 टक्के  लोकं कर्करोगाने मरतात, असं देखील कौशल किशोर यांनी सांगितलं.   

ही बातमी देखील वाचा


"शिक्षित मुलींनी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहू नये"; श्रद्धा हत्याकांडावर केंद्रीय मंत्र्याची वादग्रस्त प्रतिक्रिया