अनंत कुमार यांच्यावर सुरुवातीला लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर 20 ऑक्टोबरला त्यांना बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी बंगळुरुतील नॅशनल कॉलेजमध्ये ठेवण्यात येणार आहे.
अनंत कुमार यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने मागील आठवड्यात शुक्रवारीच दिली होती. परंतु त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यांना काही दिवस आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पंरतु आज त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान अनंत कुमार यांच्या निधनामुळे आज कर्नाटकात तीन दिवसांचा दुखवट जाहीर करण्यात आला आहे. तर आज एक दिवसाची सुट्टी घोषित केली आहे.
अनंत कुमार यांचा राजकीय प्रवास
अनंत कुमार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला होता. ते तब्बल सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. 1996 पासून ते बंगळुरु दक्षिण मतदारसंघातून लोकसभा खासदार होते. अनंत कुमार सध्या केंद्रीय रासायनिक खते आणि संसदीय कामकाज या दोन खात्यांचा कारभार पाहत होते. सुरुवातीला त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. त्यानंतर विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपमध्ये सामील झाले. अनंत कुमार हे कर्नाटक भाजपचे माजी अध्यक्षही होते.
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक
अनंत कुमार यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह तसंच इतर नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. "केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या निधनाने अतिशय दु:ख झालं. त्यांच्या जाण्याने देश आणि विशेषत: कर्नाटकच्या जनतेला मोठा धक्का बसला आहे. त्यांचं कुटुंब, सहकारी आणि त्यांच्याशी संबंधित अगणित लोकांचं मी सांत्वन करतो," अशी प्रतिक्रिया राष्ट्रपतींनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर लिहिलं आहे की, “माझे सहकारी आणि मित्र अनंत कुमार यांच्या निधनाचं वृत्त मिळताच मला फार दु:ख झालं. ते उत्तम नेते होते, त्यांनी तारुण्यात राजकारणात प्रवेश केला आणि शेवटपर्यंत अतिशय मेहनतने लोकांची सेवा केली. त्यांना कायमच चांगल्या कामांसाठी ओळखलं जाईल.”