भोपाळ : राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचे पडघम माजू लागले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्यांचे घोषणापत्र जारी केले आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसने जारी केलेल्या घोषणापत्रावरुन राज्यासह देशातले वातावरण तापले आहे. काँग्रेसने यामध्ये म्हटले आहे की, सत्तेत आलो तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी घालू. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपने अनेक संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मध्य प्रदेशात सत्ता आल्यावर आरएसएसला ताळ्यावर आणण्याचे वचन काँग्रेसने दिले आहे. तसेच राज्यातील सरकारी कार्यालये आणि परिसरात आरएसएसच्या शाखा घेण्यावर बंदी घालण्यात येईल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शाखेमध्ये भाग घेऊ दिला जाणार नाही.


यावर भाजपकडून सर्वप्रथम पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पात्रा म्हणाले की, काँग्रेसच्या वचनात राम मंदिर बांधू दिले जाणार नाही, संघाच्या शाखा लागू दिल्या जाणार नाहीत, यावरच लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.