ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि यूट्यूब यासारख्या सोशल मीडियांचा वापर पॅरामिलिट्रीतील जवानांना यापुढे संमतीशिवाय करता येणार नाही. कुठलेही वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ त्यांना सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाहीत. पॅरामिलिट्री जवानांना कुठलीही पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी त्यांच्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल.
गेल्या काही वर्षांमध्ये अधिकाधिक जवानांकडे स्मार्टफोन आले आहेत. त्यापैकी अनेक जण सोशल मीडियावर अॅक्टिव्हही असतात. ही सवय कमी करण्यासाठी कडक शिस्तीचं पालन करण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी स्पष्ट केलं.
पॅरामिलिट्री जवान आणि आर्मी जवानांमध्ये मोठा भेदभाव होत असल्याचा आरोप पॅरामिलिट्री जवानांनी केला आहे. मात्र आर्मीच्याही अनेक युनिट्समध्ये याआधीच स्मार्टफोनवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचं कडेकोट पालन आता केलं जात आहे.
व्हिडीओ अपलोड करणारा जवान आता 'प्लंबर', BSFकडून तेज बहादूरची बदली
बीएसएफ जवान तेज बहादूर यादवनं अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करीत फेसबूकवर व्हिडिओ अपलोड करुन खळबळ माजवली होती. सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेलं सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकत असल्याचे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली आहे. अनेकवेळा तर उपाशी झोपावं लागत, असल्याचंही या जवानाने म्हटलं आहे.
त्यानंतर बीएसएफने एक पत्रक काढून तेज बहादूर मानसिक रुग्ण असल्याचं स्पष्टीकरण दिलं. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर तेज बहादूर यादवची दुसऱ्या युनिटमध्ये बदली करण्यात आली आहे.
BSF जवानापाठोपाठ CRPF जवानाचा व्हिडीओ व्हायरल
तेजबहादूर यांच्यानंतर मथुरेतील सीआरपीएफच्या जवानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. जीत सिंह असं या जवानाचं नाव असून त्याने या व्हिडिओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आपल्या समस्या मांडल्या आहेत. जीत सिंह यांनी या व्हिडीओद्वारे लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांना मिळणाऱ्या सुविधांमधील तफावतीवर बोट ठेवलं आहे. पेन्शनसह ज्या सुविधा लष्कराला मिळतात त्या सीआरपीएफच्या जवानांनाही मिळाव्यात, अशी मागणी जीतसिंह यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे