नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसतेय. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. मात्र नागरिक कोणची पर्वा न करता सार्वजनिक ठिकाणी, पर्यटनस्थळी, बाजारपेठांमध्ये, कार्यक्रमांमध्ये वावरताना दिसत आहे. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्रालयाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत. 


राज्यांचे मुख्य सचिव आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने पत्र पाठवत कोरोना संबंधिचे नियम पाळण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी ठरवलेले मानक व एसओपी लागू केले पाहिजेत. सार्वजनिक ठिकाणे आणि बाजारपेठांमध्ये होत असलेल्या गर्दीवर लक्ष ठेवले पाहिजे आणि बेजबाबदारपणा असेल तिथे परिस्थितीनुसार कडक कारवाईचे निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत. 


केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्य सरकारांना पत्र पाठवून त्यांना निर्बंध पुन्हा लागू करण्यास सूचना दिल्या आहेत. पत्रात त्यांनी म्हटलं की, ज्या ठिकाणी कोरोना नियम पाळले जात नाहीत तेथे पुन्हा लॉकडाऊन लावले जावे. पर्यटकांच्या गर्दीचा उल्लेखही त्यांनी या पत्रात केला आहे.  कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर गृह मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्बंधांमध्ये सूट देण्यास परवानगी दिली आहे.


मात्र त्यानंतर देशातील बर्‍याच भागात कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः सार्वजनिक वाहतूक आणि हिल स्टेशन, बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. तेथे मास्क, सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. कोरोनाचे बरेच वेरिएंट अद्याप सक्रिय आहेत. अशा परिस्थितीत लोक कोरोनाचे नियम न पाळता बाहेर फिरत आहेत ही चिंतेची बाब आहे. असं या पत्रात म्हटलं आहे.


Coronavirus : मुंबईत कॉकटेल अॅन्टीबॉडीजचा प्रयोग यशस्वी; औषधोपचारानंतर मृत्‍यू दरामध्‍ये तब्‍बल 70 टक्‍के घट


देशातील कोरोनाची सद्यस्थिती


आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 32 हजार 906 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2020 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आतापर्यंत 4 लाख 10 हजार 784 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच, काल दिवसभरात 49 हजार 07 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.22 टक्क्यांवर पोहोचला आहे. 


Zika Virus : केरळमध्ये झिका व्हायरसचा प्रादुर्भाव; 23 जणांना लागण, अलर्ट जारी


देशातील लसीकरणाची परिस्थिती? 


देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 38 कोटी 14 लाख 67 हजार 646 हून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच काल दिवसभरात 40 लाख 65 हजार 862 लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 30,66,12,781 लोकांना पहिला लसीचा डोस, तर 7,48,54,865 लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. देशात लसीकरण मोहीमेचा तिसरा टप्पा सुरु केल्यानंतर 18 ते 44 वयोगटातील 11,41,34,915 नागरिकांना लसीचा पहिला डोस, तर 38,88,828 नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, राजस्थान, तमिलनाडु, बिहार, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांत 18 ते 44 वयोगटातील 50 लाखांहून अधिक नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. 


Zika Virus : देशात घोंघावतंय झिका व्हायरसचं संकट; दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत अलर्ट जारी