Central Government Employees DA: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून आनंदाची बातमी आहे. कोरोना काळात केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Central Government DA increase by 11% three installments)रोखण्यात आला होता. आता या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यावरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. मागील वर्षी कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ते रोखले होते. महागाई भत्त्याच्या तीन हफ्त्यांवर हे निर्बंध आणले होते. आता हे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.


आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोना काळात बंद केलेला महागाई भत्ता आता वाढवून मिळणार असल्यानं केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


आज या बाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार गेल्या वर्षी 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याच्या तीन हफ्त्यांवरील निर्बंध हटवले आहेत. आता हे निर्बंध हटल्यानंतर तीन हफ्त्यात एकूण 11 टक्के वाढ होणार आहे. म्हणजे महागाई भत्त्याच्या सध्याच्या 17 टक्क्यांमध्ये वाढ होऊन ती 28 टक्के होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.   


केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारी लोकांना लाभ होणार आहे. देशात कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यानंतर अर्थव्यवस्थेवरील वाढता ताण पाहता महागाई भत्ते वाढवण्यावर निर्बंध आणले होते. मागील वर्षी कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर एप्रिल महिन्यात केंद्रीय कॅबिनेचनं सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता दोन हफ्त्यात देण्यावर बंदी आणली होती. महागाई भत्त्याचे हफ्ते प्रत्येक सहा महिन्याला दिले जातात. 1 जानेवारीला एक तर दुसरा 1 जुलैला हा हफ्ता सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो.  


का दिला जातो महागाई भत्ता
वाढत्या महागाईमुळं वस्तुंच्या किमती देखील वाढत जातात. त्यामुळं लोकांजवळ असलेल्या पैशांची क्रय क्षमता कमी होत जाते. यासाठी सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते. ज्यामुळं कर्मचाऱ्यांना वाढत्या खर्चाचा सामना करण्यासाठी मदत होते.