Antonio Guterres India Visit: संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या कार्याकाळातील हा दुसरा दौरा आहे. गुटेरेस त्यांच्या दौऱ्याची सुरूवात महाराष्ट्रातून होणार आहे. मुंबईत 26/11 च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत.
यूएन महासचिव ताज पॅलेस हॉटेल येथे आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत सहभागी होणार आहेत. तसेच आयआयटी मुंबईत होणाऱ्या भारत -संयुक्त राष्ट्र संघ सहकार्य या विषयावर होणाऱ्या परिसंवाद संबोधित करणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्या कार्यकाळातील हा दुसरा दौरा आहे. या दौऱ्यात गुटरेस गुजरातच्या केवडिय येथे मिशन लाईफवर आधारित बुकलेटच्या लोगो आणि टॅगलाईन लॉन्चच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींनी नोव्हेंबर 2021 मध्ये हवामान बदलासंदर्भात आयोजित केलेल्या ग्लासगोतील COP26 दरम्यान लाइफ ही संकल्पना जगासमोर मांडली होती. आपल्या भाषणात मोदींनी जागतिक समुदायाला पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी 'माइंडलेस ऐवजी माइंडफुल" आंतरराष्ट्रीय जनचळवळीचे आवाहन केले होते.
डिसेंबर 2022 मध्ये भारतात होणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आधी महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्या भेटीदरम्यान ते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा करणार आहेत. यादरम्यान, येत्या काही दिवसांत जी-20 चे अध्यक्षपद भारतात येण्याबाबतही चर्चा होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, त्यांच्या गुजरात दौऱ्यादरम्यान अँटोनियो गुटेरेस स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पुष्पांजली अर्पण करण्यासाठी केवडिया येथे जाणार आहेत. त्यानंतर मोढेराच्या सूर्य मंदिराला भेट देण्यासाठी देण्याची देखील शक्यता आहे. नुकतेच मोढेरा हे भारतातील पहिले सौरऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करण्यात आले.