Umesh Pal Murder: अतिक अहमदचा जवळचा साथीदार (गुंड) आणि उमेश पाल (Umesh Pal) हत्येमागचा आरोपी गुड्डू मुस्लिम याच्या ठिकाणाचा तपास लागला आहे. आरोपी गुड्डू मुस्लिम छत्तीसगडमध्ये लपून बसल्याची माहिती समोर येत आहे. ओडिशातील एका व्यक्तीची चौकशी केल्यानंतर गुड्डू मुस्लिमचे नवीन ठिकाण उघड झाले आहे.


प्रयागराजमध्ये उमेश पाल यांची 24 फेब्रुवारीला भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात गुड्डू मुस्लिम सीसीटीव्हीत बॉम्ब फेकताना दिसत होता. उमेश पाल यांची हत्या झाल्यापासून स्पेशल टास्क फोर्स (STF) गुड्डू मुस्लिमच्या शोधात आहेत. उत्तर प्रदेशच्या एसटीएफने (STF) ओडिशातील सोहेला येथे राजा खान नावाच्या व्यक्तीची चौकशी केली होती. चौकशीदरम्यान, गुड्डू मुस्लिम यावेळी छत्तीसगडमध्ये लपून बसला असल्याची माहिती एसटीएफला मिळाली आहे.


बरेली जेलमध्ये रचला गेला उमेश पाल यांच्या हत्येचा कट 


उमेश पाल यांच्या हत्येप्रकरणी अतिक अहमदला मुख्य आरोपी बनवण्यात आले. यूपीतील बरेली तुरुंगात त्याचा भाऊ अशरफ याने उमेश पाल यांच्या हत्येचा कट रचला होता. अतिकचा मुलगा असद, आरोपी उस्मान आणि गुड्डू मुस्लिम अशरफला भेटण्यासाठी 11 फेब्रुवारीला बरेली तुरुंगात गेले होते. भेटीसाठी गेलेल्या या तिघांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत.


तुरुंगातच भेटीदरम्यान उमेश पाल यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. अशरफची तुरुंगात भेट घेतल्यानंतर बरोबर 13 दिवसांनंतर, म्हणजेच 24 फेब्रुवारीला उमेश पाल यांची दिवसाढवळ्या बॉम्ब फेकून आणि गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हाती लागलेल्या सीसीटीव्हीत असद, उस्मान आणि गुड्डू मुस्लिम हे तिघेही आरोपी दिसत आहेत.


आरोपी उस्मान आणि असद यांचाही एन्काऊंटर


आरोपी उस्मानचा तपास घेऊन त्याला पकडण्यासाठी 6 मार्चला पोलीस रवाना झाले. याच दरम्यान चकमक झाली आणि पोलिसांच्या गोळीबारात आरोपी उस्मान मारला गेला.  उमेश पाल यांना मारण्यासाठी आरोपी ज्या कारमध्ये आले होते ती कार उस्मान चालवत होता. या हत्या प्रकरणातील दुसरा आरोपी असद आणि गुलाम यांना 13 एप्रिलला उत्तर प्रदेश (UP) एसटीएफ (STF) ने झाशी येथे झालेल्या चकमकीत ठार केले.


उमेश पाल हत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी अरबाज याचा 27 फेब्रुवारीला एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. त्याचवेळी पोलीस कोठडीत अतिक आणि अश्रफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उमेश पाल खून प्रकरणात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अतिकचा सर्वात महत्त्वाचा साथीदार गुड्डू मुस्लिम पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.


संबंधित बातम्या:


Atiq Ahmad Son Encounter: असद अहमदचं महाराष्ट्र कनेक्शन समोर, उमेश पालचा खून केल्यावर पुणे आणि नाशिकमध्ये आले होते असद आणि गुलाम