Atiq Ahmad Son Encounter: उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा असदचं काल एन्काऊंटर झालं. असदला दिल्लीतील एका माजी खासदारानं मदत केली होती, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. तसंच, उमेश पालची हत्या केल्यावर असद आणि त्याचा शार्पशूटर गुलाम नाशिक आणि पुण्यालाही येऊन गेले. येथे त्यांना अबू सालेमच्या गुंडांनी मदतही केली. अबू सालेम आणि अतीक यांची जुनी मैत्री असल्याचं तपासात समोर आलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश पालची हत्या केल्यानंतर असद आणि गुलाम हे मोटरसायकलवरून प्रयागराजहून कानपूरला गेले होते. कानपूरहून दोघेही रोडवेजच्या बसमध्ये बसले आणि नोएडाला पोहोचला. महाविद्यालयीन शिक्षण घेताना असद नोएडामध्ये ज्या ठिकाणी राहायचा त्याच ठिकाणी ते गेले. परंतु काही दिवसानंतर असदला नोएडामध्ये असुरक्षित वाटल्याने त्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतील एका राजकारण्याने संगम विहार परिसरात त्यांची राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर मेरठ, राजस्थानमध्ये असदने आपला मुक्काम हलवला.त्यानंतर ते नाशिकमध्ये आले.
नाशिकला पोहोचल्यानंतर असद आणि गुलाम पुण्याला गेले, जिथे अबू सालेमच्या जवळच्या साथीदाराने त्यांची राहण्याची व्यवस्था केली. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनीही दोघांचा शोध सुरू केला. याची माहिती मिळताच दोघेही दिल्लीला परतले. तीन दिवसांपूर्वी दोघेही अचानक झाशीला आले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असद आणि गुलाम पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा कट रचत होते. त्यासाठी गुड्डूलाही झाशीला यावे लागले.
अतिकनेही मुंबईत आश्रय घेतला होता
एसटीएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक अहमदचे अबू सालेमसोबत खूप जुने नाते आहे. 2007 मध्ये राज्यात बसपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर पोलिसांनी अतिकवर नजर होती. तेव्हा तो अबू सालेमकडे पळून गेला आणि अनेक दिवस मुंबईत लपून बसला होता. यावेळी असदने अबू सालेमची मदत घेतली होती.
उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काउंटर
उत्तर प्रदेश एसटीएफनं दिलेल्या माहितीनुसार झाशी जिल्ह्यातील परिछा भागात असद आणि त्याचा साथीदार लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जेव्हा पोलिस या दोघांना अटक करण्यासाठी गेले, तेव्हा चकमक उडाली. संरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात असद आणि गुलाम दोघेही ठार झाले. या दोघांवर पाच लाखांचं इनाम होतं. एन्काऊंटरनंतर घटनास्थळावरुन पोलिसांनी परदेशी बनावटीची अँटोमॅटिक पिस्तुलं जप्त केली आहेत. उमेश पाल यांच्या हत्येला 50 दिवस उलटण्याआधीच मारेकऱ्यांना यमसदनी धाडल्यानं पाल कुटुंबानं न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केलीय. अतिक अहमदच्या दहशतीला अखेर पोलिसांच्या गोळीनं उत्तर मिळालंय. त्याच्या पाच मुलांपैकी एकाला पोलिसांनी यमसदनी धाडलंय.