Ukraine Russia War : गेल्या 11 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनवर यांच्यात युद्ध सुरु आहे. युक्रेनवर रशियाचे हल्ले अजूनही सुरूच आहेत. अशा परिस्थितीत अनेक भारतीय तिथे अडकून पडले होते. त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा सुरु केले आहे. ही कारवाई करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने आपले अनेक मंत्रीही पाठवले आहेत. दरम्यान, काल रात्री उशीरा, युक्रेनची राजधानी कीवमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन  विमान दिल्ली विमानतळावर दाखल झाले. यामध्ये 200 हून अधिक विद्यार्थी मायदेशात दाखल झाले आहेत. 


दरम्यान, भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना कीवमध्ये आलेले भयंकर अनुभव यावेळी सांगितले. तिथे संपूर्ण शहर कसे उद्ध्वस्त झाले होते, त्यांच्याकडील खाण्यापिण्याचे पदार्थ संपले होते. पण भारतीय दूतावासामुळे आम्ही जिवंत परतलो असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. कीवहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय अनेक तास विमानतळावर आपल्या मुलांची वाट पाहत होते. मुलांना पाहताच त्यांनी मिठी मारली. फुले, हार आणि तिरंगा घेऊन त्यांचे कुटुंबीय मुलांना घेण्यासाठी विमानतळावर दाखल झाले होते. विद्यार्थ्यी विमानतळावर दाखल होताच यावेळी भारत मातेच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच मिठाई देखील वाटण्यात आली. 


माझ्या मुलीला सुरक्षित पाहून खूप आनंद झाला


युक्रेनमधून परतलेल्या हर्षिताच्या आईने सांगितले की, माझी मुलगी सुखरुप परतल्याचे पाहून मला खूप आनंद झाला आहे. आधी खूप भीती वाटायची पण आता सगळं ठीक आहे. भारत सरकारमुळे माझी मुलगी तिथून परत येऊ शकली आहे. भारत सरकारचे आभार. उपस्थित मंत्र्यांचे देखील आभार त्यांनी मानले.


हर्षिताने सांगितले की, सरकारने खूप मदत केली आहे. अन्नापासून पाण्यापर्यंत सर्व काही पुरवले गेले आणि कुठेही कमतरता नव्हती. कीवहून परतलेल्या विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर तिथली परिस्थिती किती बिकट आहे हे कळलं. विद्यार्थी अनेक दिवस अन्नपाण्याविना बंकरमध्ये राहत होते असे हर्षिताने सांगितले.
 
उमर जहाँ आणि कमर जहाँ या दोघी बहिणी खार्किवहून भारतात परतल्या आहेत. तेथील परिस्थिती किती बिकट आहे हे त्यांनी सांगितले. लोक एकाच वेळी जेवण करत आहेत. असे दृश्य आपल्यासमोर कधी येईल असे कधीच वाटले नसल्याचे त्यांनी सांगितले. खार्किवहून परतलेल्या अनुरागने सांगितले की, चित्रपटांमध्ये जसे सीन्स असतात तसे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत. तो भारतात जिवंत परत येईल अशी त्याला अजिबात अपेक्षा नव्हती, पण ऑपरेशन गंगा चालवल्याबद्दल त्याने भारत सरकारचे आभार मानले.


दरम्यान, भारत सरकारने 'ऑपरेशन गंगा' आता पूर्ण गतीने सुरु केले आहे.  ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या एकूण 20 हजार भारतीयांपैकी 13 हजार भारतीय मायदेशी परतले आहेत. पण तरीही सुमीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणणे हे एक आव्हान राहिले आहे. कारण या भागात दोन सैन्यांमध्ये युद्ध सुरु आहे. अशा परिस्थितीत सुमारे 700 विद्यार्थ्यांना बाहेर काढणे मोठे आव्हानच नाहीतर, पण जीवालाही धोका आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: