Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. केवळ उत्तर प्रदेशमधील मतदानाचा एक टप्पा बाकी राहिला आहे. बाकी पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या ठिकाणची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सहा टप्पे पार पडले असून, एका टप्पा अद्याप बाकी आहे. दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये पक्षाची कामगिरी उत्कृष्ट राहील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात पुन्हा भाजप सरकार स्थापन करण्याचा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला. पंजाबमध्येही भाजपची स्थिती मजबूत होईल, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले आहे. या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा पक्षाला मिळाला असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.


विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला


पाच राज्यांच्या निवडणुकीच्या शेवटच्या फेरीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी संपला. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात शाहा म्हणाले की, भाजपने शास्त्रशुद्ध निवडणूक प्रचार सुरु केला. निवडणुकीच्या प्रचारात बूथ स्तरापासून ते राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत भाजप उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल आणि त्याला इतर कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याची गरज भासणार नाही, असे ते म्हणाले.


पाच राज्यातील जनतेने भाजपला साथ दिली आहे, असे मी निश्चितपणे सांगू शकतो. ज्या चार राज्यांत भाजपची सत्ता आहे, तेथे भाजपचे पुनरागमन होईल आणि पंजाबमध्ये आमची स्थिती मजबूत होईल.' असे शाह यांनी सांगितले. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशचा दौरा केला आणि राज्यात प्रथमच लोकशाही तळागाळात फोफावत असल्याचे शाह म्हणाले. 


उत्तर प्रदेशमध्ये काही नेत्यांनी पक्ष सोडला पण मतदारांनी भाजपला सोडले नाही. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने 2017 च्या निवडणुकीत दिलेल्या 92.6 टक्क्यांहून अधिक आश्वासनांची पूर्तता केली आहे. तसेच केंद्र सरकारच्या योजना राज्यांमध्ये यशस्वीपणे राबवल्या असल्याचे शाह म्हणाले. 


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बेरोजगारी, महागाई आणि भटकी जनावरे यांसारख्या मुद्द्यांवर होणाऱ्या परिणामाबाबत विचारले असता शाह म्हणाले की, मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे गरीबांना आशा निर्माण झाली आहे की जनतेचे जीवनमान चांगले होईल. जवळपास साडेसात वर्षे देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार सुरु आहे. 


दरम्यान, पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केला आहे. पंजाबमध्ये भाजपला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. भाजप पंजाबमध्ये प्रथमच 65 पेक्षा जास्त जागा लढवत आहे. आम्हाला तेथे खूप सकारात्मक जनसमर्थन मिळाले आहे आणि आम्ही तेथे अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळवू असे नड्डा यावेळी म्हणाले.


पंजाबमध्ये भाजपची शिरोमणी अकाली दलाशी युती होती. मात्र, केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवरून ही युती तुटली. भाजपने माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग धिंडसा यांच्या नेतृत्वाखालील अकाली दल (युनायटेड) यांच्याशी युती केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तराखंड, पंजाब आणि गोव्यात एकाच टप्प्यात मतदान झाले. तर उत्तर प्रदेशात 7 टप्प्यात आणि मणिपूरमध्ये दोन टप्प्यात. पाच राज्यांतील मतमोजणी एकाच वेळी 10 मार्च रोजी होणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: