Ukraine President Zelenskyy writes to PM Modi : युक्रेनच्या पहिल्या उपपरराष्ट्र मंत्री एमिने झापारोव्हा यांनी भारताशी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युद्धग्रस्त युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना पत्र लिहिले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) आज (12 एप्रिल) दिली. झापरोवा यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांना हे पत्र सुपूर्द केले.


परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमध्ये सहमतीने तारीख ठरवून युक्रेनची राजधानी किव्हमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. युक्रेनच्या पहिल्या उपपरराष्ट्र मंत्री झापारोव्हा यांचा आज पहिला तीनदिवसीय भारत दौरा आटोपला. गेल्या वर्षी 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर ही युक्रेनकडून पहिलीच भारत भेट आहे.  युक्रेनने औषधे आणि वैद्यकीय उपकरणांसह अतिरिक्त मानवतावादी मदतीची विनंती भारताकडे केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालायाने दिली आहे. 


भारतीय कंपन्यांसाठी संधी


मंत्रालयातील सचिव (पश्चिम) संजय वर्मा यांच्याशी झालेल्या बैठकीत, युक्रेनच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांनी युक्रेनमधील पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी ही भारतीय कंपन्यांसाठी एक संधी असू शकते, असे मत व्यक्त केले. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झापारोव्हा यांनी त्यांच्या द्विपक्षीय दौऱ्यात भारतासोबत अधिक मजबूत आणि जवळचे संबंध निर्माण करण्याच्या युक्रेनच्या इच्छेवर प्रकाश टाकला. झापारोव्हा यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्य सुलभ होईल, असे त्यात म्हटले आहे. तसेच द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करण्याबरोबरच, पंतप्रधान मोदींना उद्देशून राष्ट्रपती झेलेन्स्की यांचे एक पत्र सुपूर्द केल्याची माहिती देण्यात आली आहे.


दरम्यान, यावेळी झालेल्या बैठकीत वर्मा यांनी भारताने युक्रेनसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे पुरवली तसेच युक्रेनला स्कूल बस इ. पुरवल्याची माहिती सादर केली. तसेच दोन्ही बाजूंमधील आंतर-सरकारी आयोगाची (Inter-governmental commission) पुढील बैठक भारतात होणार आहे.


युक्रेन रशिया युद्धात भारताची भूमिका काय?


गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये युक्रेन संघर्ष सुरु झाल्यापासून, पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन तसेच युक्रेनचे नेते झेलेन्स्की यांच्याशी अनेकवेळा चर्चा केली आहे. गेल्यावर्षी 4 ऑक्टोबर रोजी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणात मोदी म्हणाले की, "कोणताही लष्करी उपाय असू शकत नाही" आणि भारत कोणत्याही शांतता प्रयत्नांमध्ये योगदान देण्यास तयार आहे." युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा भारताने अद्याप निषेध केलेला नाही आणि हे संकट मुत्सद्दीपणाने आणि संवादाने सोडवले जाणे आवश्यक असल्याचे मत आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या