Russia-Ukraine Crisis : युक्रेन आणि रशिया यांच्यामधील वाद थांबण्याचे नाव घेत नाही. युक्रेनच्या सीमेवरून रशियन सैन्याला तळावर परत बोलावण्यात आले असूनही भीतीदायक वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशिया कोणत्याही क्षणी युक्रेवर हल्ला करु शकतो, असा इशारा दिला आहे. भयावह परिस्थिती पाहाता युक्रेनमध्ये असणाऱ्या भारतीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यांनी भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. युक्रेनमध्ये भारताचे जवळपास 18 हजारांपेक्षा जास्त लोक अडकले आहेत. यामध्ये वैदकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तेथील परिस्थिती दिवसागणिक चिघळत आहे, यावर भारत सरकारही लक्ष ठेवून आहे.
भारताच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ताने (Foreign Ministry spokesman) सांगितले की, ‘युक्रेन-रशिया सीमावर (Ukraine-Russia border) नेमकं काय सुरु आहे, हे आपण आताच ठोसपणे काही सांगू शकत नाही. स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, मूल्यांकनानंतर आपण कोणत्याही सूचना जारी करतो. तेथील भारतीयांसाठी आताही काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पण अद्याप भारतीयांना एअरलिप्ट करायचं की नाही? याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही. ‘
युक्रेनमधील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहे. हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. तसेच तेथे मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. युक्रेनमधील दूतावासात सामान्य पद्धतीने काम सुरु आहे, असे विदेश मंत्रालयाने सांगितले. तेथील विद्यार्थी दूतावासासोबत संपर्कात आहेत, असेही ते म्हणाले. भारताची भूमिका स्पष्ट आहे, तेथील तणाव त्वरित कमी करण्याच्या बाजूने आम्ही आहोत. तसेच राजनैतिक चर्चेद्वारे तोडगा काढण्याबाबत हलचाली सुरु करण्यात आल्या आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
जर्मनी – फ्रान्स दौऱ्यावर जाणार विदेश मंत्री –
विदेशमंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) 18 ते 23 फेब्रुवारी रोजी जर्मन आणि फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत. जयशंकर जर्मनीमध्ये म्यूनिख सिक्योरिटी डायलॉगमध्ये (Munich Security Dialogue) सहभाग घेणार आहेत. जर्मनीनंतर 20 फेब्रुवारी रोजी पॅरिसमध्ये फ्रान्स विदेश मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत असे, विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
युक्रेनमधील भारतीय लोकांसाठी हेल्पलाईन क्रमांक -
युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. या हेल्पलाईन क्रमांकाच्या मदतीने हे लोक फ्लाईट आणि इतर गोष्टींची माहिती गोळा करू शकतात. यासाठी युक्रेनमधील भारतीय एंबेसी +380997300428 आणि 38099730483 या क्रमांकांवर कॉल करू शकतात. या हेल्पलाईन 24 तास सुरू राहणार आहेत.