Mahakal Corridor Ujjain : मध्य प्रदेशमधील (MP) उज्जैन (Ujjain) येथे भव्य अशा मंदीर परिसराचा निर्माण केला जात आहे. विशेष म्हणजे या कॉरिडोरचा (Mahakal Corridor) आकार काशी विश्वनाथ मंदिरापेक्षा तब्बल चार पटीने मोठा आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी या कॉरिडॉरला भेट दिली. पाहणीनंतर त्यांनी दिलेल्या माहितीत सांगितले की, ''आतापर्यंतचं काम पाहून मी समाधानी आहे. 11 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या नवीन कॉरिडॉरचे उद्घाटन करणार आहेत. महाकाल कॉरिडॉरचे काम दोन टप्प्यात केले जात असून त्यासाठी सुमारे 750 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 350 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे संपूर्ण कॉरिडॉर सुमारे 900 मीटर परिसरात बांधण्यात आलं आहे.



स्थानिकांना रोजगारही मिळणार


या भव्य कॉरिडोरचा आकार अत्यंत भव्य असल्याने याठिकाणी विविध गोष्टी भक्तांसाठी उपलब्ध असणार आहेत. यामध्ये शिव तांडव स्तोत्र, शिव विवाह, महाकालेश्वर वाटिका, महाकालेश्वर मार्ग, शिवअवतार वाटिका, प्रचार हॉल, नूतन शाळा परिसर, गणेश विद्यालय परिसर, रुद्रसागर तट विकास, अर्धपथ परिसर, धर्मशाळा आणि पार्किंग सेवा या साऱ्याचा समावेश आहे. या सर्वामुळे या कॉरिडॉरमध्ये दर्शन आणि फेरफटका मारताना भाविकांना एक खास अनुभव मिळणार आहे. हे कॉरिडॉर चालवण्यासाठी सुमारे एक हजार लोकांची गरज लागणार असल्याने येथील स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील.






पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण


महाकाल कॉरिडोरचे बांधकाम 2019 मध्ये सुरू झाले होते. हा संपूर्ण मंदिर परिसर दोन हेक्टरमध्ये असून त्यासाठी सुमारे 750 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. बांधकामाच्या एकूण खर्चापैकी 422 कोटी रुपये राज्य सरकार, तर 21 कोटी रुपये मंदिर समिती आणि उर्वरित रक्कम केंद्र सरकार खर्च करणार आहे. कॉरिडोरच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 ऑक्टोबरला कॉरिडॉरचे उद्घाटन करणार असल्याची माहिती दिली. त्यादृष्टीने सर्व तयारीही पूर्ण झाली असल्याचं ते म्हणाले.  


हे देखील वाचा -