नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यार्थ्यांच्या पदवीवर ओळख पटवण्यासाठी फोटोसह आधार नंबर बंधनकारक केला आहे. याबाबतचा अध्यादेश यूजीसीनं सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या नावे पाठवला आहे.
याबाबतची माहिती देताना यूजीसीचे सचिव डॉ. जसपाल संधू यांनी सांगितले की, विद्यार्थ्याची ओळख पटवण्यासाठी त्याचा फोटो आणि आधार नंबर पदवी प्रमाणपत्रावर असला पाहिजे. यामुळे मार्कशीटच्या सुरक्षिततेसोबत त्याची ओळख पटवण्यामधील अडचणी दूर होतील.
सचिवांनी सांगितलं की, प्रमाणपत्रावर शैक्षणिक संस्थेचं नाव, कोणत्या प्रकारात शिक्षण पूर्ण केलं (पूर्ण वेळ कि अर्धवेळ) याबाबतचीही माहिती असली पाहिजे. यासाठी यूजीसीने कुलगुरुंना अध्यादेश पाठवला आहे. यामध्ये पदवी प्रमाणपत्रावर देण्यात येणारी माहिती खरी असावी, असंही नमुद केलं आहे.
कारण, संबंधित व्यक्तीला त्याच्या पदवी प्रमाणपत्राची विविध कामांसाठी आयुष्यभर गरज असते. त्यामुळे आधार नंबर आणि फोटो दिल्यास सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात समानता आणि पारदर्शकता राखली जाईल.