सुरत : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगाची हवा खाणाऱ्या आसाराम बापूवर उद्या जोधपूरमधील न्यायालय निकाल देणार आहे. तत्पूर्वी साध्वी प्रज्ञा यांनी आसाराम बापूला निर्दोष असल्याचे म्हटले आहे. ईश्वराने आसाराम बापूंना दोषमुक्त करावे, अशी प्रार्थनाही साध्वी प्रज्ञा यांनी केली.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर साध्वी प्रज्ञा पहिल्यांदाच गुजरातमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
साध्वी प्रज्ञा म्हणाल्या, “न्यायालयाचा निर्णय तर उद्या येईलच. न्यायाधीश काय निर्णय सुनावतील, हे त्यांच्यावर आहे. मात्र मला वाटतंय की, ईश्वराने आसाराम बापूंना दोषमुक्त करावं. कारण ते दोषी नाहीत.”
2013 पासून आसाराम बापू जेलमध्ये!
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधील एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. जोधपूरबाहेर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला होता. त्यावेळी मुलगी आश्रमात राहत होती आणि ती 16 वर्षांची होती.
दिल्लीच्या कमलानगर मार्केट पोलिस स्टेशनमध्ये आसारामविरुद्ध शून्य नंबरचा गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर तो जोधपूरमध्ये ट्रान्सफर करण्यात आला.
आसाराम बापूवर भारतीय दंडविधान कलम 342, 376, 354-अ, 506, 509/34, जेजे अॅक्ट 23 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूला इंदूरमधून 31 ऑगस्ट 2013 रोजी अटक केली होती. तेव्हापासून आसाराम बापू जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद आहे.
कसा चालला खटला?
जोधपूर सत्र न्यायालयात आसारामविरुद्धचा खटला सुरु होता. कोर्टाने आरोप निश्चित केले. आरोपपत्रात 58 साक्षीदार सादर करण्यात आले. तर सरकारी वकिलांनी 44 साक्षीदारांनी जबाब नोंदवला. 11 एप्रिल 2014 पासून 21 एप्रिल 2014 दरम्यान पीडित मुलीचा 12 पानांचा जबाब नोंदवला. 4 ऑक्टोबर 2016 रोजी आरोपी आसारामचा जबाब नोंदवण्यात आला.
22 नोव्हेंबर 2016 पासून 11 ऑक्टोबर 2017 पर्यंत बचाव पक्षाने 31 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सोबतच 225 दस्तऐवज जारी केले. एससी-एसटी कोर्टात 7 एप्रिलला युक्तिवाद पूर्ण झाला आणि कोर्टाने निकाल सुनावण्यासाठी 25 एप्रिलची तारीख निश्चित केली.
आसाराम बापू निर्दोष, ईश्वराने त्यांना दोषमुक्त करावं : साध्वी प्रज्ञा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Apr 2018 09:07 PM (IST)
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधील एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. जोधपूरबाहेर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला होता. त्यावेळी मुलगी आश्रमात राहत होती आणि ती 16 वर्षांची होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -