नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अंतिम वर्षाच्या/सेमिस्टर परीक्षांबाबत नव्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा वाढली आहे. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच म्हणजे येत्या एक-दोन दिवसात जारी होतील अशी अपेक्षा आहे. कोरोनाव्हायरसचं संकट आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी यूसीजीला आपल्या मार्गदर्शक सूचनांवर फेरविचार करण्याचे निर्देश दिले होते.


याआधी यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांची वाट न पाहता, महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश ओदिशा आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांनी महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या राज्यांमधील काही खासगी विद्यापीठ ऑनलाईन परीक्षा घेणार आहेत. यामुळे विद्यार्थी अद्यापही संभ्रमात आहेत. परिणामी त्याचं लक्ष यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांकडे लागलं आहे. दरम्यान यूजीसीच्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याची घोषणा होऊ शकते.


गुजरातचे शिक्षण मंत्री भुपेंदरसिंह चुडासमा यांनी सांगितलं की, "केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवून पुढील आदेशापर्यंत परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्याने कार्यवाही केली. परंतु केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यावर अद्याप प्रतिसाद दिलेला नाही."


"आम्ही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि यूजीसीच्या निर्देशांची वाट पाहत आहोत. एकदा का त्यांच्याकडून निर्देश मिळाले तर राज्य सरकार निर्णय घेईल," असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री सी एन अश्वथनारायण यांनी सांगितलं.


दुसरीकडे अंतिम वर्षांच्या परीक्षांसदर्भात निर्णयाची शिफारस करण्यासाठी तामिळनाडू सरकारने स्वत: चे पॅनल स्थापन केलं आहे.


केंद्रीय विद्यापीठे यूजीसीच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. मॉक टेस्टमध्ये अनेक अडचणी येऊनही दिल्ली विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा आठवड्याभराने होणार आहेत.


मे 2020 मध्ये यूजीसीकडून मार्गदर्शक सूचना जारी
याआधी यूजीसीने मे 2020 मध्ये अंतिम वर्ष/सेमिस्टर परीक्षांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये अंतिम वर्षाच्या किंवा अंतिम सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु कोरोनाव्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि काही राज्य सरकारांनी असमर्थता दाखवल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यूजीसीला पुन्हा एकदा मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.


परीक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांची मोहीम
कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाहता विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्यासाठी आणि अंतर्गत मूल्यांकन तसंच मागील सत्राच्या परीक्षेत गुणांच्या आधारावर पदवी द्यावी या मागणीसाठी पत्र, सोशल मीडिया आणि कोर्ट खटल्यांद्वारे मोहीम राबवली आहे. याशिवाय ट्विटरवर #NoMoreWaitUGC आणि #StudentsLives Matter यांसारख्या ट्रेण्डद्वारे विद्यार्थी आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचवत आहेत.


केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळांच्या परीक्षा रद्द केल्या, तर मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परंतु विद्यापीठ परीक्षांबाबद अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. परिणामी नोकरी किंवा पुढील शिक्षणाच्या दृष्टीने काय निर्णय घ्यावा, याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत.