पुणे : विद्यार्थ्यांमधील लठ्ठपणाची समस्या सोडवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने कॉलेज कँटीनमध्ये मिळणाऱ्या जंक फूडवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील विद्यापीठांसाठी हा निर्णय असणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील तरुणांच्या आरोग्याबाबत प्रचंड जागरुता दाखवली आहे.  त्यामुळेच देशातील कॉलेज कँटीनमध्ये यापुढे पिझ्झा, बर्गरसारखे पदार्थ हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी विद्यार्थी कल्याण विभागातच स्वतंत्र उपविभाग बनवण्यात यावा. या विभागाद्वारे विद्यार्थ्यांचे पोषक आहार, व्यायाम याबद्दल समुपदेशन केले जावे. बरोबरच त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडूनही मार्गदर्शन केले जावे, असं यूजीसीचं म्हणणं आहे.

लठ्ठपणा ही जागतिक समस्या आहे, कारण जगातील लठ्ठ माणसांच्या संख्येत अमेरिका आणि चीनच्या पाठोपाठ भारताचा लठ्ठपणात तिसरा नंबर लागतो. भारतात 90 लाखांहून जास्त पुरुष आणि विशेषत: तरुण लठ्ठपणाची शिकार झाले आहेत. तर महिलांमध्ये हे प्रमाण अतिप्रचंड आहे, कारण हा आकडा 2 कोटींच्या घरात आहे.

लठ्ठपणाचे परिणाम

पुढच्या पाच वर्षात हे प्रमाण दुप्पट होण्याची भीती आहे. लठ्ठपणा फक्त तुमच्या हालचालींवरच बंधनं आणतो असं नाही, तर तो अनेक रोगांना निमंत्रण देणाराही ठरतो. डायबेटिस, उच्च रक्तदाब, ह्रदयाचे विकार, पक्षाघात, पित्ताशयाचे विकार असे रोग लठ्ठपणामुळे उद्भवतात.

एकीकडे लठ्ठ लोकांचा प्रदेश वाढत असताना अंडरवेट लोक असलेला मोठा देश म्हणूनही भारत आघाडीवर आहे. जगाच्या तुलनेत भारतात 40 टक्के लोक अंडरवेट आहेत. गरीबी आणि पोषणाचा प्रश्न गंभीर असल्याने ही वेळ आली आहे. त्यामुळे समतोल प्रकृती ठेवण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे.