लखनौ : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याबाबत भाजपकडून अद्याप गुप्तता पाळण्यात आली आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत.

लखनौमध्ये आमदारांची बैठक  

सूत्रांच्या माहितीनुसार, लखनौमध्ये 18 मार्चला होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य हे मुख्यमंत्रिपदासाठी मनोज सिन्हा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवतील. निरीक्षक म्हणून नेमणूक झालेले व्यंकय्या नायुडू आणि भूपेंद्र यादव हे मनोज सिन्हा यांच्या नावावर आमदारांची संमती घेतील आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना त्याबाबत माहिती देतील. त्यानंतर अमित शाह स्वत: मनोज सिन्हा यांच्या नावाची घोषणा करतील.

उत्तर प्रदेशात भाजपने मोठा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत चर्चा सुरु झाल्या. मात्र, एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार मनोज सिन्हा हेच या शर्यतीत सर्वात पुढे आहेत.

मनोज सिन्हा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे निकटवर्तीय मानले जातात. केंद्रीय मंत्र्यांनीही मनोज सिन्हा यांच्या नावावर संमती दर्शवली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उमा भारती, डॉ. महेश शर्मा, महेंद्र पांडे यांनीही सिन्हांच्या नावाला समर्थन दिलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंळात मंत्री म्हणून मनोज सिन्हा यांचं काम उत्तम असल्याचं मानलं जातं आहे. मनोज सिन्हा आतापर्यंत तीनवेळा गाजीपूरमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत.

आयआयटी बीएचयूमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर, बीएचयू विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपदही भूषवलं आहे.

मनोज सिन्हा हेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनण्यासाठी आणखी एक दाट शक्यता म्हणजे ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली, तिथे तिथे भाजपने जाती-पाती पाहून मुख्यमंत्री बनवले नाहीत. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, हरियाणात मनोहर लाल खट्टर आणि झारखंडमध्ये रघुवर दास ही तीन उदाहरणं देता येतील. अशीच परंपरा मोडत भाजप मनोज सिन्हा यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी बसवेल, अशी दाट शक्यता आहे.