मुंबई : गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गोव्यात जाणार आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला विशेष महत्त्व आले आहे.
महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असाच सामना रंगणार असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं असताना, गोव्यात 2017 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजप समोर शिवसेनेनं दंड थोपटले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्त्वात गोव्यातील निवडणुकीसाठी शिवसेनेने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र, आता थेट शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरल्याने गोव्यातील निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कसा असेल उद्धव यांचा गोवा दौरा?
गोव्यात आजपासून उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसांचा दौरा सुरु होत आहे. या दौऱ्याची सुरवात सकाळी 10 च्या सुमारास पणजीच्या आझाद मैदानातील डॉ. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीचं दर्शन घेऊन होणार आहे. दुपारी पणजी पासून जवळच गाडगे महाराज सभागृहात शिवसेनेच्या गोव्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील.
उद्धव ठाकरे - सुभाष वेलिंगकर बैठक
संध्याकाळी आरएसएसमधून बंडखोरी करून बाहेर पडलेले सुभाष वेलिंगकर यांची उद्धव ठाकरेंसोबत महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुभाष वेलिंगकर यांनी नुकताच स्थापन केलेला गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना यांच्या युती संदर्भात चर्चा होणार आहे. गोव्यात शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंचची युती झाली तर ते भाजपसाठी किती अडचणीचं ठरू शकतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.