नवी दिल्ली : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीला अखेर मुहूर्त ठरला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला होता.


निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखेसह, विविध राज्यांमधील 64 विधानसभा जागांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या. मात्र साताराऱ्याच्या पोटनिवडणुकीची आयोगाने घोषणा केली नव्हती. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता आणि उदयनराजे भोसले यांची चिंता काहीशी वाढली होती. मात्र आता विधानसभेच्या निवडणुकांसोबतच सातारा पोटनिवडणुकीचं 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबरलाच मतमोजणी होणार आहे.


मात्र निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकांच्या घोषणांवेळी सातारा पोटनिवडणुकीची घोषणा का केली नाही? यामागे काही राजकारण आहे का? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.


उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. उदयनराजे यांच्या राजीनाम्यामुळे साताऱ्याची जागा रिक्त झाली होती. विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होईल, याच अटीवर उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं बोललं जात होतं.




विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार या मिलियन डॉलर प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. दिवाळीपूर्वीच राज्यात निवडणूक पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 ची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात 21 ऑक्टोबरला मतदान होईल. तर निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्लीत याबाबत घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होणार आहे. तर हरियाणाच्या 90 जागांसाठी मतदान होईल. दोन्ही राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.


संबंधित बातम्या

VIDEO | दिवाळीनंतर निवडणुका घेण्याची काही पक्षांची मागणी, निवडणूक आयोगाची माहिती | ABP Majha