नवी दिल्ली : देशाची 2021 सालची जनगणना ही डिजीटल पद्धतीने होणार असल्याचे संकेत गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहेत. मोबाईल अॅपद्वारे जनगणना करण्याचे शाह यांनी दिल्लीतल्या एका कार्यक्रमात सांगितले आहे. याशिवाय देशात सर्व कामांसाठी एकच कार्ड असावं असाही विचार त्यांनी मांडला.


या एकाच कार्डमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, बँक खातं, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्सचा (वाहनचालक परवाना) समावेश असणार आहे. दरम्यान सर्व ओळखपत्र एकाच ओळखपत्रात येणार असल्याने गोपनिय माहितीला धोका ठरु शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

देश डिजीटल होतोय मग देशाची लोकसंख्या मोजण्यासाठी जुनी पद्धत कशाला? यासाठीच 2021 ची जणगणना मोबाईल अॅपवरुन होईल असं गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केलं. जनगणनेसाठी जे अॅप असेल त्यातून लोकांची माहिती सरकारपर्यंत पोहोचवली जाईल.

दरम्यान, हे अॅप देशाच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत कसं पोहोचेल. यातून येणारे आकडे कितपत खरे असतील, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जनगणनेमुळे फक्त लोकसंख्याच कळते असं नाही तर लोकांचा आर्थिक तपशील आणि अनेक प्रकारची महत्त्वाची माहितीही गोळा केली जाते. याआधी सरकारने आधार कार्ड प्रणाली सुरु केली तेव्हा आधार कार्डमुळे प्रत्येकाची गोपनिय माहिती लीक होत असल्याचे सांगत अनेकांनी कोर्टापर्यंत धाव घेतली होती.

आता नव्या ओळखपत्रात लोकांचे आधार कार्ड, व्होटर आयडी, बँक खाती, पासपोर्ट या सर्वाचा समावेश असणार आहे. त्यामुळे लोकांच्या वैयक्तिक आणि गोपनिय माहितीला मोठा धोका उद्भवू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.