नाशिक/जळगाव : नाशिक आणि जळगावहून आजपासून विमानसेवा सुरु होणार आहे. यामुळे नाशिक आणि जळगाव ही दोन्ही शहरं मुंबईशी जोडली जाणार आहेत. मात्र या विमानांच्या वेळापत्रकावरुन अजूनही संभ्रम आहे. कारण नियोजित वेळापत्रकानुसार आज सकाळी होणारी विमानाची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
आधीच्या वेळापत्रकानुसार नाशिकहून आज पहाटे 6 वाजता मुंबईच्या दिशेनं विमान झेपावणार होतं. पण हे विमान अचानक रद्द करण्यात आलं आहे. तर तिकडं जळगावसाठी मुंबईहून सकाळी ७ वाजता विमान उड्डाण घेणार होतं. पण हेही विमान रद्द करण्यात आलं. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी दिसते.
जळगावमध्ये चंद्रकांत पाटील हे विमान सेवेचं उद्घाटन करतील, तर नाशिकच्या ओझर विमानतळावर संध्याकाळी 5 वाजता पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे या विमानसेवेचं उद्घाटन करणार आहेत.
कोल्हापुरात संताप, शिवसेनेचं आंदोलन
नाशिककर, जळगावकर आज आनंदात असले, तरी कोल्हापूरकर चांगलेच संतापलेले पाहायला मिळत आहेत. उडाण योजनेअंतर्गंत विमानसेवेला विलंब होत असल्यानं आज कोल्हापुरात शिवसैनिकांनी खेळण्यातील विमान उडवून निषेध नोंदवला आहे.
शिवसेनेच्या वतीने 22 फुटी कागदी विमानाची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. तेही काही वेळात उडवण्यात येईल, असं कळतं आहे. इथं कधी विमान सुरु होईल याची कोणतीही माहिती प्रशासनातर्फे देण्यात येत नाही. फक्त तारखांवर तारखा दिल्या जात असल्यानं कोल्हापूरकर तीव्र नाराज आहेत.
नांदेड-अमृतसर विमानसेवा सुरु
नांदेड- अमृतसर विमानसेवेला आजपासून सुरुवात झाली आहे. अमृतसरहुन पहिल्या फ्लाईटने 170 भाविक नांदेडला पोहचले. नांदेडहून 52 प्रवासी घेऊन एअर इंडियाचे विमान अमृतसरला रवाना झालं.