चारा घोटाळा : मागासवर्गीय असल्याने न्यायाची आशा : लालू
एबीपी माझा वेब टीम | 23 Dec 2017 12:16 PM (IST)
एकाच कोंबजीची 9 वेळा काय कुर्बानी देणार? आज नाहीतर उद्या, न्याय तर नक्कीच मिळेल, असेही लालूप्रसाद यादव यावेळी म्हणाले.
रांची (झारखंड) : आपण मागासवर्गीय असल्याने चारा घोटाळ्यात न्याय मिळण्याची आशा असल्याचे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. चारा घोटाळ्यावर आज रांचीतील विशेष सीबीआय कोर्ट निर्णय सुनावणार आहे. त्यावेळी लालूप्रसाद यादव यांनी एबीपी न्यूजशी प्रतिक्रिया व्यक्त केली. एकाच कोंबडीची 9 वेळा काय कुर्बानी देणार? आज नाहीतर उद्या, न्याय तर नक्कीच मिळेल, असेही लालूप्रसाद यादव यावेळी म्हणाले. चारा घोटाळ्यावर आज दुपारी 3 वाजता रांचीतील विशेष सीबीआय कोर्ट निकाल सुनावणार आहे. निकाल ऐकण्यासाठी लालूप्रसाद यादव हे मुलगा तेजस्वी यादवसोबत रांचीत दाखल झाले आहेत. “न्याय मिळण्याची आशा आहे. वकिलांनी जे पुरावे सादर केलेत, त्याचं मला समाधान आहे. सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन मी करतो.”, असे लालू म्हणाले. लालूंचे वकील काय म्हणाले? “आम्ही आमची बाजू प्रभावीपणे मांडली आहे. लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात कोणतेच पुरावे नाहीत, ज्यामुळे त्यांना शिक्षा मिळेल. आम्हाला 100 टक्के खात्री आहे की, लालूप्रसाद यादव यांना निर्दोष सोडले जाईल.” असे लालूंचे वकील म्हणाले. दरम्यान, रांचीतील कोर्टाबाहेर मोठ्या संख्येने लालूप्रसाद यादव यांचे समर्थक गोळा झाले आहेत. त्यामुळे कडेकोट सुरक्षेचा बंदोबस्त करण्यात आला आहे. चारा घोटाळा नेमका काय आहे? 1996 साली चारा घोटाळा उघड झाला होता. त्यावेळी हा घोटाळा 950 कोटी रुपयांचा होता. आजचा निर्णय देवघर तिजोरीमधून काढलेल्या रकमेशी संबंधित आहे. लालूंनी 90 लाख रुपये अवैधरित्या काढल्याचा आरोप आहे. चारा घोटाळ्याचे एकूण सहा खटले आहेत. यातील एका खटल्यात 2013 साली लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे ते काही काळ निवडणुकीच्या राजकारणातून दूर झाले. त्या खटल्यात पाच वर्षांची शिक्षा झाली असली, तरी ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. चारा घोटाळ्याशी संबंधित सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी व्हावी, अशी याचिका लालूप्रसाद यादव यांनी सुप्रीम कोर्टात केली होती. मात्र कोर्टाने याचिका फेटाळली आणि प्रत्येक खटला स्वतंत्रपणे चालवण्याचे आदेश दिले. चारा घोटाळा समोर आणणारे सध्या झारखंडमध्ये मंत्री चारा घोटाळा ज्यांनी पुराव्यानिशी समोर आणला, ते याचिकाकर्ते सरयू राय हे सध्या झारखंडमध्ये मंत्री आहेत. सरयू राय यांना कधीकाळी वाटलंही नव्हतं की, चारा घोटाळा इतकं मोठं रुप घेईल आणि त्यात लालूप्रसाद यादवांना तुरुंगवासाची शिक्षा होईल. 1990 मध्ये चारा घोटाळ्याला सुरुवात चारा घोटाळ्याला 1990 साली सुरुवात झाली होती. त्यावेळी लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. बिहारचे पशूपालन विभागाची बनावट बिलं देऊन चाऱ्याच्या नावाने सरकारी तिजोरीतून रक्कम काढली गेली. यात अधिकारी, कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांचाही हात होता. या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांच्यावर एकूण सहा खटले सुरु आहेत. चाईंबासा खटल्यात लालूप्रसाद यादव यांना 2013 साली पाच वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र जामिनावर ते बाहेर आहेत.