थिरुवनंतपुरम : केरळच्या दोन महिलांनी शबरीमला मंदिरात भगवान अयप्पाचं दर्शन घेतल्याचा दावा केला आहे. बिंदू आणि कनकदुर्गा अशी या दोन महिलांची नावं असून त्यांचं वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे. "आम्ही पहाटे साडेतीन वाजता भगवान अयप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी पोलीस आमच्या सोबत होते," अशी माहिती या महिलांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितलं. सुरक्षेच्या कारणामुळे दर्शन घेतल्यानंतर या दोन्ही महिला कुठे गेल्या याची माहिती देण्यात आलेली नाही.


10 आणि 50 वर्षांच्या महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी दिला होता. मात्र या आदेशानंतरही आतापर्यंत कोणत्याही 'प्रतिबंधित' वयाच्या महिलांनी अयप्पाचं दर्शन घेतलेलं नाही. अनेक महिला कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु मोठ्या विरोधामुळे त्यांना प्रवेश करता आला नाही.

महिला, पोलीस आणि मीडियावर दगडफेक
एक दिवस आधीच शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाच्या मागणीसाठी मंगलवारी केरळमध्ये मानवी साखळी बनवणाऱ्या महिलांवर भाजप-आरएसएसच्या काही कथित कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. या लोकांनी मीडिया प्रतिनिधी आणि पोलिसांवरही दगडफेक केली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.