नवी दिल्ली : खूप मोठ्या कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीवरुन काँग्रेसने मोदींना लक्ष्य केले आहे. मोदींच्या मुलाखतीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये सुरजेवाला म्हणाले की, पंतप्रधानांची मुलाखत 'मी, मला, माझे' या तीन मुद्द्यांभोवती फिरत होती. मोदींनी इतकी मोठी मुलाखत देण्यापेक्षा आमच्या 10 प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आवाहनही सुरजेवाला यांनी मोदींना केले आहे.

राफेल प्रकरण, देशाची सुरक्षा आणि देशातल्या वाढत्या महागाईवरुन काँग्रेस सातत्याने मोदींना लक्ष्य करत आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी जे आरोप केले त्या आरोपांबाबत मोदींनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा, अशी मागणीदेखील काँग्रेसने केली. त्यानंतर आज पंतप्रधानांनी जाहीर मुलाखत देऊन विरोधकांना उत्तर दिले.

परंतु मोदींनी दिलेल्या 95 मिनिटांच्या मुलाखतीवर काँग्रेस समाधानी नाही. त्यामधल्या कोणत्याही उत्तरावर समाधानी नसलेल्या काँग्रेसने मोदींना 10 प्रश्न विचारले आहेत. मोदींनी या 10 प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आवाहन काँग्रेसने केले आहे.

काँग्रेसचे 10 प्रश्न

  1. नागरिकांच्या खात्यावर 15 लाख रुपये केव्हा जमा होणार?

  2. 100 दिवसांमध्ये देशात येणारे 80 लाख कोटी रुपये कधी येणार?

  3. 9 कोटी रोजगार कधी येणार?

  4. नोटबंदी आणि जीएसटीमुळे व्यापार उध्वस्त का केले?

  5. शेतमालावर 50 टक्के नफा मिळणार होता, परंतु सध्या खर्च केलेले पैसेदेखील का मिळत नाहीत?

  6. जीएसटीमुळे लहान व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान का केले?

  7. राष्ट्रीय सुरक्षेचे काय झाले? (काश्मीरमध्ये 428 आणि नक्षलवादी हल्ल्यात 248 जवान शहीद झाले)

  8. देशातील भ्रष्टाचाराबाबत मोदी काय बोलणार?

  9. राफेलबाबत मोदी उत्तरं कधी देणार?

  10. गंगा नदी अजून साफ का झाली नाही? देशात 100 स्मार्ट शहरं का तयार झाली नाहीत?