लखनौः उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एकाच रुळावर दोन ट्रेन आल्याने प्रवाशांची चांगलीच खळबळ उडाली. मोटरमनने वेळीच ब्रेक लगावल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या प्रकारामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ही घटना घडली. दिल्लीच्या दिलकुशा गार्डन क्रॉसिंगवर लखनौ-प्रतापगड पॅसेंजर ट्रेन आणि लखनौ-बालामऊ पॅसेंजर ट्रेन जात होत्या. दोन्ही ट्रेनला सिग्नल मिळणार होता. मात्र सिग्नल अचानक बंद पडल्याने ही घटना घडली, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

 

सिग्नल फेल झाल्यामुळे दोन्ही गाड्यांच्या मोटरमनने इमर्जंन्सी ब्रेकचा वापर करुन गाड्या थांबवल्या, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. इमर्जन्सी ब्रेकचा वापर केल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि एक तासानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली, अशी माहिती रेल्वेतील एका प्रवाशाने दिली.