मुंबई : घरासाठी धडपडत असलेल्या नोकरदारांच्या मदतीला, त्यांच्या हक्काची बचत पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधी येणार आहे. कारण आता पगारातून नव्हे तर जमा झालेल्या पीएफच्या रकमेतून घरासाठी हप्ते देण्याची सुविधा मिळणार आहे. ही सुविधा मार्च 2017 अखेर सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय भविष्यनिर्वाह निधी आयुक्त व्ही. पी. रॉय यांनी दिली.
सुमारे 4 कोटी पीएफधारकांना याची सुविधा मिळणार आहे. स्वस्त घरांसाठी नोकरदारांच्या पीएफमधील रक्कम कर्जांच्या हप्त्यांच्या रुपाने वापरता येईल, असं ईपीएफओच्या विचाराधीन आहे. पीएफ गहाण ठेवून, त्यावर गृहकर्ज मिळू शकेल.
पीएफचा घरासाठी कसा वापर होईल?
स्वस्त घराच्या खरेदीसाठी नोकरदाराला आपला पीएफ तारण ठेवता येणार आहे. तसंच या रकमेतून तो घरकर्जाचे हप्ते फेडू शकेल.
कोणत्या घरांसाठी सुविधा मिळणार?
ईपीएफओने स्वस्त घरासाठी ही सुविधा आणण्याची तयारी केली आहे. मात्र स्वस्त घरं म्हणजे नेमकी किती किमतीची, हा निकष अजून ठरलेला नाही. याबाबत अजून विचारमंथन सुरु आहे.