लंडन: भारतातून कित्येक वर्षांपूर्वी चोरी झालेल्या दोन प्राचीन कलाकृतींचा अमेरिका-ब्रिटनच्या एका सर्च टीमने शोध लावला. ही आनंदाची बातमी भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच समजली. यापैकी एक मूर्ती आंध्र प्रदेशची आहे, ही मूर्ती इ.स.पूर्व एक शतक अगोदर किंवा एका शतकानंतर चूनखड्यापासून बनवण्यात आली होती, तर दुसरी मूर्ती 'नवनीत कृष्ण' ही सतराव्या शतकातील असून कांस्याने बनवण्यात आलेली होती.


15 ऑगस्टला लंडनमधील गांधी हॉल ऑफ इंडिया हाऊसमध्ये ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान या दोन्ही मूर्ती भारतीय उच्च आयुक्त रुची घनश्याम यांना सोपवण्यात आल्या. "या मूर्तींची किंमत केली जाऊ शकत नाही इतकी मौल्यवान ही शिल्प आहेत, या कलाकृतींचे भारतात परत येणे हे अमेरिका-ब्रिटनचे भारतासोबत असलेल्या मैत्रीचं प्रतिक आहे,"असंदेखील घनश्याम म्हणाल्या. चूनखड्यापासून बनवलेली मूर्ती तब्बल 2000 वर्षांपूर्वीची तर कांस्याची मूर्ती 300 वर्षांपूर्वीची असल्याची माहिती भारतीय उच्च आयुक्त रुची घनश्याम यांनी दिली.

पुरातन वस्तूंची तस्करी करणाऱ्या सुभाष कपूर यांच्यावर या मूर्तींच्या चोरीचा आरोप कोला जात होता, मात्र लंडनमधील एका व्यक्तीकडे ही शिल्प आढळली, ज्याचं नाव प्रशासनाने बाहेर येऊ दिलं नाही. भारतीय वस्तूंसोबत इतर देशांचाही इतिहास सांगणाऱ्या बऱ्याच मौल्यवान वस्तू या व्यक्तीकडे आढळल्या, त्याने सर्व वस्तू इन्व्हेस्टिगेशन टीमच्या स्वाधीन केल्या.

"जगभरातील प्रांतातून लुटल्या गेलेल्या कलाकृतींचे सांस्कृतिक महत्त्व आर्थिक मूल्यांच्या पलीकडे वाढलेले आहे. या कारवाईतून जप्त करण्यात आलेले तुकडे इतिहासाचे पुरावे आहेत आणि त्यांचा हक्काच्या देशात परत जाण्याचा त्या वस्तूंचा बहुमान आहे," असं एचएसआय न्यूयॉर्कचे एजंट पीटर सी.पीटर सी. फिट्झुघ म्हणाले.