पणजी : राज्यात बेकायदेशीर धर्मपरिवर्तन करणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरुंना गोवा पोलिसांनी अटक केली. डॉमनिक डिसोझा आणि जॉन मास्कारेन्हास अशी अटक झालेल्या धर्मगुरुंची नावं आहेत. बेकायदा धर्मांतराच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी सडये शिवोली इथल्या फोर्थ पीलर चर्चच्या डॉमनिक डिसोझा आणि जॉन मास्कारेन्हास यांना अटक करण्यात आली. धर्मांमध्ये द्वेष पसरवण्याच्या कारणाखाली गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.


म्हापसा पोलिसांनी गुरुवारी (26 मे) रात्री साडेआठच्या सुमारास कारवाई करत शिवली इथून डॉमनिक डिसोझा आणि जॉन मास्कारेन्हास यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांच्यावर कलम 153 अ, (धर्मावर आक्षेपार्ह किंवा हल्ले करणे) , 295 अ (धार्मिक भावना भडकावणे) तसंच औषधे आणि उपाय कायदा 1954 च्या कलम कलम 3 आणि 4 (आक्षेपार्ह जाहिराती) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


प्रकाश खोबरेकर नाव्याच्या व्यक्तीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, "डिसोझा आणि मस्कारेन्हास यांनी एका अज्ञात व्यक्तीला त्याचा धर्म सोडून धर्मांतर करण्यास प्रवृत्त केलं होतं." याशिवाय आरोपींनी जाणूनबुजून शब्द, कृतीतून धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने धमकावलं आणि त्यांनी सांगितलेला धर्म स्वीकारण्याचं आमिष दाखवल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.


गोव्यात मागील अनेक वर्षांपासून डॉमनिक आणि जॉन बेकायदेशीररित्या धर्मपरिवर्तन करत असत. पैसे, औषधं आणि चांगलं खाणं-पिणं याचं आमिष दाखवून गरीब नागरिकांना धर्म बदलण्यास सांगत असत. आरोपींविरोधात याआधी अशाप्रकारचे आठ गुन्हे दाखल आहेत.


या दोघांचं यापूर्वी चर्चच्या कामकाजावरुन स्थानिक रहिवाशांसोबत वाद झाले होते. परंतु जिल्हा प्रशासनाने इशारा देऊन त्यांना सोडलं होतं.


दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याआधीच धर्मपरिवर्तन यावर बंदीचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमादरम्यान राज्यात बेकायदेशीर धर्मपरिवर्तन होत असल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. 



Goa : गोव्यात उद्धवस्त मंदिरांची पुनर्बांधणी होणार, CM Pramod Sawant यांची मोठी घोषणा