नवी दिल्ली : भारत, थायलंड आणि म्यानमार यांना जोडणारा 1400 किलोमीटर लांबीचा महामार्ग निर्माण केला जाणार आहे. हा महामार्ग पूर्णत्वास गेल्यानंतर दक्षिण-पूर्व देशांशी भारताला थेट जोडता येणार आहे. व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


 

थायलंडमधील भारताचे दूत भगवंत सिंह बिश्नोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान तयार करण्यात आलेल्या 73 पुलांच्या मदतीने हा महामार्ग बनवण्यात येणार आहे. एकूण 18 महिन्यांचा कालावधी या महामार्गासाठी जाणार असून, त्यानंतर महामार्ग भारत, थायलंड आणि म्यानमार या तिन्ही देशांसाठी खुला केला जाणार आहे.

 

भारताच्या मणिपूर राज्यातील मोरेहहून म्यानमारच्या तामू शहरातून थायलंडच्या माई सोट जिल्ह्यापर्यंत पोहोचेल. या महामार्गासाठी तिन्ही देशांमध्ये मोटर व्हेईकल अॅग्रीमेंटवर चर्चा होत आहे.

 

"भारत आणि थायलंडमध्ये सांस्कृतिक, आध्यात्मिक साम्य आहेत. या महामार्गामुळे व्यापार, पर्यटनासोबत अन्य गोष्टीही जोडल्या जातील. येणाऱ्या काळात चेन्नईलाही हा महामार्ग जोडला जाईल.", असे बिश्नोई म्हणाले.

 

भारत आणि थायलंडमध्ये गेल्या वर्षी 8 बिलियन डॉलरचा व्यापार झाला होता. शिवाय, गेल्या वर्षी तब्बल 10 लाख भारतीय थायलंडमध्ये पर्यटनासाठी गेले होते. त्यामुळे सर्व दृष्टीने भारत आणि थायलंड जोडला जाणे, महत्ताचे ठरणार आहे.