आकाशात विमानांची टक्कर टळली, सहा प्रवासी जखमी
एबीपी माझा वेब टीम | 03 Aug 2016 10:54 AM (IST)
गुवाहाटी : इंडिगो एअरलाईन कंपनीच्या दोन विमानांची आकाशात टक्कर होता होता टळली आहे. मात्र ही विमानं एकमेकांच्या अत्यंत जवळ आल्यामुळे झालेल्या अपघातसदृश प्रकारात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. 6E-136 गुवाहाटी-चेन्नई आणि 6E-813 मुंबई-गुवाहाटी ही इंडिगोची विमान आकाशात एकमेकांच्या परिघात अत्यंत जवळ आली होती. यावेळी दोन्ही विमानात एकूण 300 जण प्रवास करत होते, त्यापैकी सहा जण जखमी झाले असून यामध्ये दोन एअर हॉस्टेसचाही समावेश आहे. 2 ऑगस्ट 2016 रोजी हा प्रकार घडला. सुदैवाने विमानाने सेफ लँडिंग केलं. 'मान्सूनमुळे हवेत वादळ निर्माण झालं. त्यामुळे 6E 813 गुवाहाटी-मुंबई विमानाला 250 ते 300 फूट वर जावं लागलं. त्याचवेळी 6E-136 गुवाहाटी-चेन्नई हे विमान जात होतं. पायलटने यावेळी सूचना दिली होती. त्यानंतर चौघा प्रवाशांनी चक्कर आल्याची तक्रार केली, तर दोन एअर हॉस्टेस प्रथोमोपचार घ्यावे लागले.' अशी माहिती इंडिगोतर्फे देण्यात आली आहे.