श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. खात्मा झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक हिजबुलचा कमांडर असल्याची माहिती मिळत आहे.


आज सकाळी सोपोरच्या चेक-ए-ब्राथ भागात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. यानंतर लष्कराच्या जवानांनी या भागाची नाकेबंदी करुन, शोधमोहीम हाती घेतली. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून जवानांनीही गोळीबार सुरु केला, यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

दरम्यान, या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली असून, यातील एका दहशतवाद्याचं नाव परवेज अहमद वानी असं आहे. वानी हा उत्तर काश्मीरचा हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर होता.

2015 मध्ये याच परिसरातील एका मोबाईल टॉवरला वानी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लक्ष्य केलं होतं. तर 2013 मध्ये हंडवारा बाजारात वानीने दोन पोलिसांची हत्या केली होती. याशिवाय गेल्यावर्षी लंगेट पोलीस स्टेशनवरील हल्ल्यातही त्याचा हात असल्याचा पोलिसांचा संशय होता.

यावेळी लष्कराने घटनास्थळावरुन 2 एके असॉल्ट रायफल, 3 एके मॅगजीन, 90 एके राऊंड, एक इंसास रायफल, एक इंसास मॅगजीन, 13 इंसास राऊंड असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

दुसरीकडे अनंतनागमध्येही सुरक्षा रक्षकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात सीआरपीएफचे चार जवान जखमी झाले आहे. सीआरपीएफचे जवान गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी ग्रॅनेड फेकल्याचं एका जवानांनी सांगितलं. यानंतर पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून, दहशतवाद्यांचा कसून शोध सुरु आहे.